तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांवरील कोरोना प्रतिबंधक लसीची प्रायोगिक चांचणी बऱ्यापैकी यशस्वी ठरले आहे. कोरोना विषाणू स्वतःत बदल घडवून आणत असला तरी मुलांची प्रतिकारशक्ती अधिक असल्यामुळे रूपांतरित विषाणूचा त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले असल्याची माहिती शहरातील जीवन रेखा हॉस्पिटलचे प्रमुख आणि मुलांवरील लसीकरणाचा अभ्यास करणारे डॉ. अमित भाते यांनी दिली.
मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात माहिती देताना डॉ. अमित भाते म्हणाले, पालकांनी लस घेतल्यावर मुलांना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन शाळा सुरू केल्या गेल्या पाहिजेत. कोरोना लसीचा मुलांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी प्रयोग सुरू आहेत. बेळगावात देखील असा प्रयोग सुरू आहे. झोडीअस कॅडीला कंपनीच्या झायको -डी या लसीचा मुलांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास कंपनीतच केला जात आहे. बेळगावात 175 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक चांचण्या घेण्यात येत आहेत असेही डाॅ. भाते यांनी सांगितले.
बेळगावात झोडीअस कॅडीला कंपनीच्या झायको -डी या लसीचा 12 ते 18 वर्षे वयोगटातील 20 मुलांवर प्रयोग करण्यात आला आहे. मोठ्यांना कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड लस इंट्रा मस्क्युलर पद्धतीने दिली जाते. मात्र मुलांना झायको -डी लस इंट्रा डर्मल पद्धतीने म्हणजेच त्वचेद्वारे दिली जाते. मुलांमध्ये कोव्हॅक्सीनचे कोणतेही साइड इफेक्ट दिसून आलेले नाहीत. देशातील अन्य केंद्रात मुलांवर कोव्हॅक्सीनची प्रायोगिक चांचणी करण्यात आली आहे. आमच्या कोवीड सेंटरमध्ये कोरोना बाधित मुलांवर उपचार केले जात आहेत.
तिसर्या लाटेत कोरोना विषाणुमध्ये म्युटेशन होण्याची शक्यता आहे. त्याचा मुलांवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यात येत आहे. लस उपलब्ध उपलब्ध झाल्यावर मुलांचे लसीकरण सुरू करता येईल. मोठ्यांनी लस घेतल्यास मुलांना संसर्गाचा धोका कमी असतो. अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत तथापि त्या सुरू करण्यापूर्वी आवश्यक सर्व खबरदारी घेऊनच त्या सुरू कराव्या लागतील, असे डॉ अमित भाते यांनी स्पष्ट केले