लसीकरणासाठी कोणताही फॉर्म वगैरे भरण्याची आवश्यकता नाही सध्या आधार कार्डवर लसीकरण होऊ शकते असे स्पष्टीकरण करून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदिर येथील कोविड केअर सेंटर येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदिर येथील कोविड केअर सेंटरच्या दत्ता जाधव, मदन बामणे सागर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली.
कांही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी थांबून फॉर्म भरला पाहिजे असे सांगत लसीकरणाचे राजकारण करू पाहत आहेत अशी तक्रार त्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तसे कांहीही नाही, साध्या आधार कार्डवर लसीकरण होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगितले.
त्याचप्रमाणे ठराविक लोकांचेच लसीकरण केले जाणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशानुसार सरसकट सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे 18 वर्षाखालील मुलांसाठी लसीकरणासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
यावेळी दत्ता जाधव मदन बामणे आणि सागर पाटील बालाजी जोशी यांनी प्रशासनाने सुरू केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेस समितीचे कोविड केअर सेंटर सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावेळी तुम्हाला मराठा मंदिर येथे लसीकरण मोहीम राबविण्याची इच्छा असेल तर रीतसर अर्ज करा. उद्याच्या उद्या तुम्हाला लसीकरणाची परवानगी दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मदन बामणे म्हणाले की, संपूर्ण देशभरात 18 वर्षे वयोगटात वरील सर्व नागरिकांना सध्या कोव्ही शिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने देखील शहर आणि तालुक्यात ठिकाणी लसीकरणाला सुरुवात केली आहे. प्रत्येक नागरिकाने ही लस घेणे अत्यावश्यक असून त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्यापरीने जनजागृती करत आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी लसीकरण हे ठराविक लोकांसाठी नसून सर्वांसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 वर्षावरील सरसकट सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तुम्हाला जर मराठा मंदिर येथे लसीकरण मोहीम राबवायची इच्छा असल्यास रीतसर अर्ज करा, तुम्हाला तात्काळ परवानगी देण्याबरोबरच आमचे वैद्यकीय पथक लसीकरणासाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
तेंव्हा येत्या एक-दोन दिवसात मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केअर सेंटर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती मदन बामणे यांनी दिली.