कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने बेळगावसह राज्यातील एकूण 11 जिल्ह्यांसाठी लाॅक डाऊनचा कालावधी 14 जूनपासून आणखी आठवडाभरासाठी वाढविला आहे. मात्र उर्वरित जिल्ह्यांमधील अनलॉकिंगची प्रक्रिया त्याचवेळी सुरू होणार असून त्यासाठी नवी मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे.
राज्यात सध्या जारी असलेला लाॅक डाऊनचा कालावधी येत्या 14 जून रोजी समाप्त होणार असून त्यानंतर 11 जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे. तथापि बेळगावसह चिक्कमंगळूर, शिमोगा, दावणगिरी, म्हैसूर, चामराजनगर, हासन, मंगळूर, बेंगळूर ग्रामीण, मंड्या आणि कोडगु या जिल्ह्यामधील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील लाॅक डाऊन आठवडाभरासाठी वाढविण्यात आला आहे.
राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये अनलॉकगची प्रक्रिया 14 जून रोजी प्रारंभ होणार असून या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून 21 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सरकारने खालील प्रमाणे नवी मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे या मार्गदर्शक सुचीचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.
सर्व उत्पादन केंद्रे/ आस्थापने/ उद्योग कोरोना नियमांचे पालन करून 50 टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी असेल. तथापि वस्त्रोद्योगासाठी मनुष्यबळाची मर्यादा 30 टक्के असणार आहे. खाद्यपदार्थ, वाणसामान, फळे आणि भाजीपाला संबंधीची दुकाने सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. त्याचप्रमाणे रस्त्यावरील विक्रेते, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि स्वतंत्र दारू दुकाने (टेकअवे पद्धतीने) सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी असेल.
सर्व प्रकारची घरपोच डिलिव्हरीची सेवा 24 तास खुले राहील. कंटेन्मेट झोन बाहेरील सर्व प्रकारची बांधकामे कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यास परवानगी असेल. उद्याने सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत खुली राहतील. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करुन याठिकाणी फिरावयास जावे. मात्र गटागटाने फिरण्यावर अथवा व्यायाम करण्यावर बंदी असेल.
टॅक्सी आणि ऑटोरिक्षा वाहतुकीस परवानगी असेल. मात्र त्यांना एका वेळी जास्तीत जास्त दोन प्रवासी नेता येतील. सरकारी कार्यालय यापूर्वी सुरू झाली आहेत, या ठिकाणी देखील 50 टक्के मनुष्य बळासह काम केले जावे. आरोग्याशी संबंधित कौशल्य प्रशिक्षणाला परवानगी असेल. चष्म्याची दुकाने सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यु) सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कायम राहील. विकेंड कर्फ्यूचा कालावधी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत असेल. राज्याच्या कार्यकारी समितीचे चेअरमन व मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी हा आदेश काढला आहे.