बेळगावात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला असून केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये शुल्कासह 18 वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. बीम्स हाॅस्पीटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी देखील मर्यादित स्वरूपात 18 वर्षावरील ठराविक श्रेणी पर्यंतच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले आहे.
कांही संघटना आणि राजकीय पक्ष संयुक्तपणे शासनाच्या सहकार्याने विविध ठिकाणी सर्व वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करत आहेत. मात्र सध्या नेहरूनगर येथील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि येळ्ळूर रोडवरील केएलई शताब्दी हॉस्पिटलमध्ये शुल्क आकारून (780 रु.) कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नांव नोंदणी करून अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे.
सदर लसीकरण नांव नोंदणी प्रक्रियासाठी पेटीएम ॲप उपयोग करावा लागेल. ॲपवर व्हॅक्सिनेशन अलर्ट अशी सूचना येईल ही सूचना आल्याच्या 60 सेकंदात नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी कुठे करावयाची याचा तपशील तिथे दिलेला असेल. पेटीएम ॲपवरून तुम्हाला बुकिंग स्लाॅटस् कळतील. त्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल व अपॉइंटमेंट घेता येईल. त्यानंतर केएलई हॉस्पिटलमध्ये जाऊन किमान 30 मिनिटे आधी रांगेत उभे राहणे आवश्यक आहे.
नोंदणी झाल्यानंतर आलेला मेसेज आणि कोड लक्षात ठेवावा लागेल. तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक सांगावा लागेल. लसीकरण केंद्रातील कर्मचारी आपल्या डाटामध्ये त्याची पडताळणी करतील आणि तुम्हाला तुमचा वैयक्तिक कोड नंबर सांगावा लागेल तो दिल्यानंतर तुम्हाला स्लिप मिळेल. व्हॅक्सीनेशन टोकन मिळाल्यानंतर पैसे भरा आणि लसीकरण करून घेण्यासाठी व्हॅक्सीनेशन रूममध्ये जा. त्याठिकाणी लस घेतल्यानंतर 15 मिनिटे थांबून त्यानंतर घरी परता.