कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे क्रीडा क्षेत्रासह क्रीडापटूंचे मोठे नुकसान केलेले असले तरी परिस्थिती पूर्ववत होताच खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पूर्वीच्याच आत्मविश्वासाने नव्याने तयारीला लागले पाहिजे, असे मत भारतीय शरीरसौष्ठव संघाचे प्रशिक्षक मिस्टर इंडिया किताब विजेते प्रख्यात शरीरसौष्ठवपटू सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले.
कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता हळूहळू कमी होत असून लवकरच लाॅक डाऊनही समाप्त होऊन अनलॉकींगची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोरोना प्रादुर्भाव आणि लाॅक डाऊनमुळे इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्राचे देखील नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हने मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांची आज बुधवारी सकाळी भेट घेऊन क्रीडा क्षेत्रासंबंधी त्यांचे एकंदर मत जाणून घेतले. यावेळी बोलताना आपटेकर म्हणाले, कोरोना आणि लाॅक डाऊनमुळे खेळाडूंची मोठी हानी झाली आहे. हेल्थ इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
कारण लॉकडाउनच्या काळात व्यायाम शाळा, जिम, मैदाने सर्वकांही बंद असल्यामुळे खेळाडूंना घरात बसून रहावे लागले. सर्वाधिक नुकसान हे ज्युनिअर खेळाडूंचे म्हणजे उदयोन्मुख खेळाडूंची झाले आहे. कारण त्यांचे वय या दोन वर्षात वाढणार आहे आणि ते कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यांना या स्पर्धांचा अनुभव मिळणार नाही आणि आपल्या तयारीचे मूल्यमापन करता येणार नाही. याचा परिणाम कदाचित त्यांच्या भावी कारकीर्दीवर होऊ शकतो.
दुसरी गोष्ट घरी बसल्यामुळे खेळाडूंच्या सरावात खंड पडला आहे. ज्यांनी चांगली तयारी -सराव केला होता. त्यांची या काळामध्ये पीछेहाट झाली असून त्यांना पुन्हा नव्याने तयारीला लागावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना स्वतःमध्ये पूर्वीचा आत्मविश्वास आणि खेळाबाबतची तीव्र आवड, इच्छा निर्माण करावी लागणार आहे, असे आपटेकर म्हणाले.
शरीरसौष्ठवपटूच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सद्यपरिस्थितीत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि सध्या त्यांच्यात तो आलेला दिसतो आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या संकटात होरपळत आहे तेव्हा घरामध्ये देखील आपण काही गोष्टी कटाक्षाने पाळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडू अथवा शरीरसौष्ठवपटुंनी स्वतःच्या ध्येयापासून विचलित होता कामा नये. कितीही संकटे आली तरी मी माझे ध्येय गाठणारा हा आत्मविश्वास हवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून घरात जी कांही साधने उपलब्ध आहेत, त्यांच्या सहाय्याने सराव करत रहावा. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवले पाहिजे. दंड-बैठका, सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग जॉगिंग आदी व्यायामाचे प्रकार आपण घरच्या घरी करून आपल्या शरीराची योग्य देखभाल ठेवू शकतो.
पुन्हा मैदाने आणि जिम सुरू झाल्यानंतर प्रशिक्षकाने सर्वप्रथम प्रशिक्षणार्थी खेळाडूंमध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाणवला पाहिजे. त्यांच्यातील इच्छाशक्ती उत्साह पुन्हा जागृत करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या पाहिजेत. स्पर्धा जिंकण्याची ईर्षा त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. त्यासाठी खेळाडूंचा सराव घेण्याबरोबरच त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, समुपदेशन केले पाहिजे असे मत सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले
नवोदित खेळाडुंना संदेश देताना आपटेकर म्हणाले की, नवोदित खेळाडू निराश होता कामा नये. जे झाले ते विसरून पुन्हा जोमाने सरावाला लागावे. आतापासूनच योग्य सवयी लावून घ्याव्यात. कारण कोरोना व लॉकडाऊनने सर्वांना खूप कांही शिकवले आहे. तेंव्हा आपण काय केले पाहिजे, काय करू नये हे समजून घेतले पाहिजे. व्यायाम शाळा अथवा जिममध्ये गेल्यानंतर सरकारने घालून दिलेले नियम व मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करावे. खेळाडू सरावामुळे घामाघूम होत असतो यासाठी त्याने शरीराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. चांगला सराव करावा, चांगला आहार घेऊन त्यावर नियंत्रण ठेवावे.
याप्रमाणेच कोरोनामधून बऱ्या झालेल्यांनी चांगला पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ध्यान, योगा वगैरे करावे. जमतील तितके हलके व्यायाम करावेत असे सांगून औषधे जे करू शकत नाहीत ते आपली आत्मशक्ती अर्थात विल पॉवर करू शकते हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे असे मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी शेवटी सांगितले.