Wednesday, December 18, 2024

/

कोरोनामुळे क्रीडा प्रशिक्षकांच्या पाया खालची जमीन अस्थिर

 belgaum

कोरोनाने अनेकांना बेरोजगार करण्याबरोबरच क्रीडापटूंचा क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीलाही मोठी बाधा पोहोचविली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सर्व सुविधा बंद झाल्याने क्रीडा क्षेत्रावर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्या प्रशिक्षकांना आपले भविष्य ऊदास दिसू लागले आहे.

राज्यात बेंगलोरनंतर सर्वाधिक इनडोअर आणि आउटडोअर स्पोर्ट्स अकॅडमीस असणारे शहर म्हणून बेळगाव प्रसिद्ध आहे. या शहराने क्रिकेट फुटबॉल, बॅडमिंटन, कुस्ती, जुडोका, बुद्धिबळ, हॉकी, ॲथलेटिक्स, स्केटिंग, जलतरण, टेबलटेनिस, बास्केटबॉल, शरीरसौष्ठव आदी क्रीडा प्रकारात अनेक दर्जेदार खेळाडू निर्माण केले आहेत. युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या क्रीडा केंद्रासह या ठिकाणी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. बेळगावातील अकॅडमीस आणि संघटना अनेक होतकरू क्रीडापटूंना प्रशिक्षण देतात. या ॲकॅडमी आणि संघटनांमधील प्रशिक्षक उत्तम दर्जेदार क्रीडापटू घडविण्याचे काम करत असतात. मात्र आता कोरोनाने या अकॅडमींच्या आणि प्रशिक्षकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बेळगावातील क्रीडा प्रशिक्षण केंद्रे गेल्या वर्षभरात पेक्षा अधिक कालावधीपासून बंद आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांसह प्रशिक्षक सध्या बेरोजगार झाले आहेत.

राजन्स बॅडमिंटन अकॅडमीचे राजन मोहिरे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, कोरोनाने संपूर्ण क्रीडा जगताचा चुराडा केला आहे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे स्पोर्ट्स अकॅडमीकडून मानधन बंद झाल्यामुळे अनेक प्रशिक्षकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. वर्षभर आर्थिक चलनवलन ठप्प झाल्यामुळे अकॅडमी चालकांना प्रशिक्षकांना पगार देणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून एकही स्पर्धा झालेली नसल्यामुळे अनेक चांगल्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राला राम राम ठोकला आहे दुसरीकडे क्रीडा प्रशिक्षकांवर कोसळलेल्या संकटाबाबत कोणीही आवाज उठवत नसल्यामुळे तेदेखील किती दिवस तग धरतील सांगता येत नाही.

क्रीडा प्रशिक्षण केंद्रे प्रथम बंद केली जातात आणि सर्वात शेवटी उघडी जातात. अशा परिस्थितीत प्रशिक्षकांना सरकारकडून कांही आधार मिळतो का? त्यांच्या उदरनिर्वाहासाठी एखाद्या पॅकेजची घोषणा केली जाते का? आपल्याकडील बँका त्यांना कांही मदत करू शकत नाहीत का? या प्रश्‍नांचे निरसन झाले पाहिजे किंवा सरकारने या प्रकरणी लक्ष घातले पाहिजे. आपल्या देशाने ऑलम्पिक आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत. याला कारण तळागाळातील क्रीडा प्रशिक्षक आहेत. ज्यांची आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते असे सांगून विविध स्पोर्ट्स अकॅडमींमध्ये काम करणाऱ्या खाजगी प्रशिक्षकांची आपले प्रशासन काळजी घेईल का? असा सवाल राजन मोहरे यांनी उपस्थित केला.Sports

विजया क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक आणि माजी रणजी क्रिकेटपटू मिलिंद चव्हाण म्हणाले की, अकॅडमीमध्ये काम केल्यानंतर आम्हाला त्याचे मानधन दिले जाते. परंतु दुर्दैवाने लॉक डाऊनमुळे गेल्या वर्षी आणि यावर्षी देखील एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अकॅडमी बंद होती. हे दोन महिने उन्हाळी प्रशिक्षण शिबिरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी अकॅडमीमध्ये आपली नांव नोंदणी करत असतात. त्यामुळे उत्पन्न मिळवून आमच्या मानधनाची व्यवस्था होते. परंतु गेल्या वर्षापासून सर्व कांही थंड आहे. गेल्या दोन वर्षापासून एकही स्पर्धा झालेली नसल्यामुळे होतकरू क्रिकेटपटूंना आपल्या उंचावलेल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी गमवावी लागली आहे.

आरडीएस फुटबॉल अकॅडमीचे संस्थापक राहुल देशपांडे म्हणाले, कोरोनामुळे पालक वर्ग आपल्या मुलांना मैदानावर सरावासाठी पाठविण्यास घाबरत आहे. त्यामुळे आम्ही संबंधित मुलांना सराव कसा करावा याचे व्हिडिओ व्हाट्सअपवर पाठवून मार्गदर्शन करत आहोत.

कोणतीही फी मिळत नसल्यामुळे सर्व कांही सांभाळणे कठीण असले तरी मी माझ्या अकॅडमीच्या तिघा प्रशिक्षकांना कसेबसे सांभाळत आहे असे सांगून सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत सरकारने किमान नोंदणीकृत क्रीडा अकॅडमींसह त्यांच्या प्रशिक्षकांना थोडीतरी मदत करावयास हवी अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.