कोरोना प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणाखाली आलेला नाही. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढतच आहे. तथापि ठराविक क्षेत्रांना थोडी मोकळीक देता येईल, अशी माहिती देण्याद्वारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 7 जूननंतरही राज्यात लॉक डाऊन जारी राहण्याचे संकेत आज दिले.
बेंगलोर येथे आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, लाॅक डाऊनसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी कोरोनाला रोखण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत मी संबंधित सर्वांशी चर्चा करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यात क्षेत्रातील सर्वांना परवानगी देण्याचा निर्णय मी घेतला आहे.
त्यामुळे निर्यात क्षेत्राशी निगडित व्यवसाय सुरू करण्यास गुरुवारपासून परवानगी असणार आहे. राज्याच्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) राज्यातील पॉझिटिव्हिटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा खाली आला आणि नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या प्रतिदिन 5000 पेक्षा कमी झाली तरच लोक डाऊनचे निर्बंध शिथिल करावेत, अशी शिफारस सरकारकडे केली आहे.
दरम्यान, राज्यातील लाॅक डाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. मात्र तत्पूर्वी राजधानी बेंगलोरमधील नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या 1000 पेक्षा कमी होणे गरजेचे आहे. असे गेल्या 31 मे रोजी राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी स्पष्ट केले आहे.