Saturday, April 27, 2024

/

व्हॅक्सिन डेपोला संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

 belgaum

स्मार्ट सिटीच्या नांवाखाली बेकायदेशीर बांधकामे करण्याद्वारे बेळगावचे ऑक्सिजन चेंबर असलेल्या व्हॅक्सिन डेपोचा विध्वंस करण्याचा घाट रचला जात आहे. तेव्हा हा गैरप्रकार तात्काळ थांबून व्हॅक्सिन डेपोला संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी सेव्ह व्हॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशन अर्थात व्हॅक्सिन डेपो बचाव संघटनेने केली आहे.

सेव्ह व्हॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशनने आपल्या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना सादर केले असून व्हॅक्सिन डेपोला वाचविण्याची विनंती केली आहे.

पर्यावरणप्रेमी एस. जी. बिरादार यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो हा वृक्षवल्लीने समृद्ध असा परिसर म्हणजे बेळगाव शहराचा ऑक्सिजन चेंबर आहे. पर्यावरण संरक्षणासाठी काळाची गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणची वृक्षराई सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तथापि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास कामांचा नांवाखाली ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणाऱ्या येथील झाडांची कत्तल केली जात आहे. सरकारी आदेश एकेयुकेए 84 सीजीएम नुसार बेळगाव व्हॅक्सिन डेपो इन्स्टिट्यूटच्या 3.396 कि. मी. हद्दीत कोणतेही बांधकाम करण्यास निर्बंध आहे. या आदेशानुसार व्हॅक्सिन डेपोचे संरक्षण करून हा परिसर वनस्पती उद्यानासाठी राखीव ठेवावयाचा आहे. तथापि अलीकडे कांही वर्षांपासून विकासाच्या नांवाखाली विविध बांधकामे करून या ठिकाणच्या पर्यावरणाला धोका पोचविला जात आहे.Save vaccine depot

 belgaum

राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांनी गेल्या 23 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारला केलेला सूचनेत व्हॅक्सिन डेपोमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे नमूद केले होते. तथापि अलीकडे या ठिकाणी विकासाच्या नांवाने मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. याच पद्धतीने झाडांची कत्तल करून या ठिकाणी कांही वर्षापूर्वी ग्लास हाऊस उभारण्यात आले आहे, जे आत्ता बकाल अवस्थेत धूळ खात पडून आहे.

याखेरीज या ठिकाणच्या निसर्गरम्य परिसरात एव्हिएशन म्युझियम आणि ॲफ्मीथिएटर भरण्याचा घाट रचला जात आहे. ज्यामुळे पुन्हा वृक्षतोड होणार आहे. खरेतर या दोन्ही गोष्टींची याठिकाणी कांहीच गरज नाही. एव्हिएशन म्युझियमसाठी सांबरा विमानतळानजीक मोठ्या प्रमाणात रिकामी जागा पडून आहे त्या ठिकाणी त्याची उभारणी केली जाऊ शकते. तथापि कांही जण आपल्या स्वार्थापोटी व्हॅक्सिन डेपो येथेच एव्हिएशन म्युझियम आणि ॲफ्मीथिएटर उभारू पहात आहेत. जर तसे झाल्यास तो दिवस दूर नाही जेंव्हा व्हॅक्सीन डेपोमध्ये चित्रपटगृहे आणि शॉपिंग मॉल देखील उभारले जातील. ज्यामुळे अर्ध्या शहराला शुद्ध हवेच्या स्वरूपात ऑक्सिजन पुरवणाऱ्या व्हॅक्सिन डेपोचे अस्तित्व एक दिवस संपुष्टात येईल. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्मार्ट सिटीच्या नांवाखाली करण्यात येणाऱ्या बांधकामापासून व्हॅक्सिन डेपोचे संरक्षण करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनंतर बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना देखील उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे सदर निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य वन संरक्षणाधिकारी आणि बुडा आयुक्त यांना धाडण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी वरूण कारखानीस, किशोर सिंग, संगीता परिहार, अभिषेक कांबळे, संजय चौगुले, प्रवीण बिदरी, शशिकांत दरसन्नावर, गुलजार कित्तूर, सचिन रायकर, प्रशांत गुब्बी आदी सेव्ह व्हॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशनचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.