राज्याच्या मंत्रिमंडळात पुनश्च स्थान मिळवण्यासाठी गेल्या कांही आठवड्यापासून भाजप हायकमांडवर दबाव आणल्यानंतर पक्षप्रमुखांनी पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्याची खात्री दिल्यामुळे माजी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदार पदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेण्यापूर्वी रमेश जारकीहोळी यांनी आमदार पदाचा राजीनामा देऊ नये यासाठी काही पर्याय मिळतो का हे पाहण्यासाठी जारकीहोळी बंधू गोकाकमध्ये एकत्र आले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश जारकीहोळी यांची आपले बंधू भालचंद्र, लखन आणि जावई अंबीराव पाटील यांच्याशी प्रदीर्घ बैठक झाली आणि बैठकीत चर्चेअंती आमदारपद न त्यागण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, एकदा का अश्लिल सीडी प्रकरण मिटले की आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री बी. एस. येडियुप्पा आणि भाजप हायकमांडने रमेश यांना दिले आहे. यापूर्वी सरकारने अश्लिल सीडी प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी बी -रिपोर्ट दाखल करण्याची तयारी सुरू केली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकार तूर्तास थांबले आहे. आता जारकीहोळी बंधू देखील आणखी थोडा काळ थांबण्यास तयार आहेत. तसेच रमेश जारकीहोळी यांनी देखील आमदार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेण्याचे मान्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जोपर्यंत सर्व कायदेशीर बाबींचा निचरा होत नाही तोपर्यंत आमदार पदाचा राजीनामा देण्याचा अतातायी निर्णय घेऊ नये किंवा मुख्यमंत्री आणि हाय कमांडला भेटू नये, असा सल्ला कर्नाटक मिल्क फेडरेशनचे (केएमएफ) चेअरमन भालचंद्र जारकीहोळी यांनी रमेश यांना दिल्याचे समजते.
गोकाक येथे आपल्या बंधुंसोबतची बैठक आटोपताच रमेश जारकीहोळी हे आजचा आपला मुंबई दौरा रद्द करून बेंगलोरला रवाना झाले आहेत. तसेच तीनही जारकीहोळी बंधू येत्या कांही दिवसात पत्रकार परिषद घेऊन रमेश यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कळते.