कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे खुल्या वीजवाहिनीमुळे गाईचा मृत्यू झाल्याने बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गाईचा मृतदेह पालिकेसमोर ठेवून आंदोलन केल्याची घटना शहरात घडली असून यामुळे महापालिकेसमोर कांही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. अशातच पाऊस सुरू झाल्याने मोकाट जनावरांना विविध ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे चन्नम्मा सर्कल येथे पथदीपांना वीज पुरवठा करण्यासाठी बसवण्यात आलेली वीज पेटी उघडी असल्याने काल शनिवारी तिथून जाणाऱ्या मोकाट गाईंच्या कळपातील गाईंना विजेचा धक्का बसला. योगायोगाने त्याच वेळी तिथून जाणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गाईंना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूचे लोक देखील घटनास्थळी जमा झाले.
कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे दोन गाईंना वाचविण्यात यश आले. यापैकी गंभीर जखमी झालेल्या गाईवर तातडीने उपचार करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र महापालिका किंवा संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी अल्पावधीत गायीचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मृत गाय आणून महापालिकेसमोर ठेवली. तसेच मृत गाईसह महापालिकेत ठिय्या आंदोलन खेडला यामुळे कांही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. कोणीही योग्य उत्तर देत नसल्यामुळे सोमवार 21 जूनपर्यंत शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडवावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.