बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये अद्यापही कोरोनाग्रस्तांसह मृतांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या मे महिन्यात शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीमध्ये तब्बल 340 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यापैकी 149 मृतदेह कोरोना बाधित होते.
शहर आणि उपनगरांमध्ये अद्यापही कोरोनाग्रस्त रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर यापूर्वी केवळ सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जात होते.
मात्र या स्मशानभूमीत मोठ्याप्रमाणात अंत्यसंस्कार होऊ लागल्याने अलिकडे बेळगाव दक्षिणेसह उत्तरेतील कोरोनाबाधित मृतदेहांवर शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत.
गेल्या मे महिन्यात या स्मशानभूमीमध्ये 149 मृत कोरोना बाधितांसह एकूण 340 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात शहराच्या दक्षिण भागासह उत्तर आणि ग्रामीण भागातील देखील अनेक मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत आता अधिक संख्येने मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ लागल्याने या ठिकाणची जागाही अपुरी पडू लागली आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे देखील अंत्यसंस्कारासाठी जागा लवकर उपलब्ध होत नसल्याचे आढळून आले आहे.
याची विशेष दखल घेऊन मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाकडून शहापूर स्मशानभूमीमध्ये येणार्या मृतदेहांवर वेळेत अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.