बेळगाव शहर परिसरामध्ये आज मान्सूनने चांगली सलामी दिल्यामुळे दिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरणासह हवेत गारठा निर्माण झाला होता. लाॅक डाऊन जारी असल्यामुळे पावसाने जनजीवन विस्कळीत केल्याचा प्रकार यंदा घडला नसला तरी सकाळच्या खरेदीच्या वेळेत पावसामुळे अडथळा निर्माण झाला होता.
यावर्षी अवकाळी पावसाने लवकर पावसाला सुरुवात केली असली तरी आज मंगळवारी सकाळपासून खऱ्या अर्थाने मान्सूनचे बेळगाव शहर परिसरात आगमन झाले. सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे लॉक डाउनच्या सकाळच्या 6 ते 10 वाजेपर्यंतच्या सवलतीच्या सत्रात खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रेनकोट, छत्री, जॅकेट यांचा आधार घ्यावा लागला.
पावसामुळे बाजारपेठेतील नेहमीची गर्दी कमी झालेली पहावयास मिळाली. ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून सूर्यदर्शन अभावी हवेत गारठा निर्माण झाला होता, सायंकाळी तर गारठ्यामध्ये अधिकच वाढ झाल्याने नागरिकांना ठेवणीतील गरम कपडे बाहेर काढावे लागले.
शहरातील स्मार्ट सिटीची बहुतांश कामे अद्यापही रखडत सुरू आहेत काही ठिकाणी ती अर्धवट अवस्थेत पडून आहेत. अशा ठिकाणी पावसामुळे चिखलाची दलदल निर्माण होण्याबरोबरच रस्ते चिखलाने माखून गेले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सखल भागात पाण्याची तळी साचली असून ठिकठिकाणच्या नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसामुळे काही ठिकाणी साफसफाई अभावी गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत होते.
दरम्यान, अंतिम टप्प्यात आलेल्या पेरण्यांसाठी आजचा पाऊस उपयुक्त ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मृगा नक्षत्राने भात पेरणीला साजेसा हंगाम दिल्यामुळे बेळगाव परिसरातील भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा असतानाच आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.