फलोत्पादन खात्यातर्फे 2021 -22 मधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत फळाफुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रोप वाटप करण्याबरोबरच आर्थिक मदत केली जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नारळ, आंबा, केळी, पपई, काजू यासह अन्य फळे व फुलांची रोपे पुरवण्यात येणार आहेत.
याबरोबरच वैयक्तिक कृषी तळ्यांसाठीही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. फलोत्पादन क्षेत्र वाढविण्याबरोबरच फळाफुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
फलोत्पादन खात्याकडून मनरेगा अंतर्गत अनुसूचित बीपीएल शिधापत्रिकाधारक अल्पभूधारक शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत घेता येणार आहे. यासाठी खात्याकडून मातीचे परीक्षण करून इच्छुक शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.