गावातील यात्रोत्सवानिमित्त घरातील अंथरूण-पांघरूण धुण्यासाठी नदीवर गेलेले एकाच कुटुंबातील 4 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदी पात्रात वाहून गेल्याने बेपत्ता झाल्याची हृदयद्रावक घटना अथणी तालुक्यातील दरुर गावामध्ये आज दुपारी घडली.
परसप्पा गोपाळ बनसुडे (वय 42), सदाशिव गोपाळ बनसुडे (वय 35), शंकर गोपाळ बनसुडे (वय 25) आणि धरेप्पा गोपाळ बनसुडे (वय 22, सर्व रा. हल्याळ, ता. अथणी) अशी नदीत वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्यांची नांवे आहेत. हे चारही जण एकाच कुटुंबातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दरूर गावांमधील सालसाब उरूस जवळ आला आहे.
त्यामुळे गावातील घरोघरी स्वच्छता, साफसफाई सुरू आहे. गावातील लोक गावालगतच्या कृष्णा नदीकाठी कपडे वगैरे धुण्यासाठी जातात. त्यानुसार बनसुडे कुटुंबातील उपरोक्त चौघेजण नदीच्या काठी घरातील अंथरूण-पांघरूण धुण्यासाठी गेले होते. कपडे धुताना त्यांच्यापैकी एकाचा पाय घसरून तो नदीच्या पात्रात पडला. त्यावेळी इतर तिघा जणांनी त्याला वाचविण्याच्या प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने कृष्णा नदी पात्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर ते चौघेही वाहून गेले.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोध कार्य हाती घेतले आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील तब्बल चौघेजण नदीत वाहून गेल्याने दरूर गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.