दरवर्षी पावसाळा सुरू होताच आळंबी मागोमाग ग्रामीण भागातून खेकडे देखील विक्रीसाठी बाजारात येतात. त्यानुसार आता सध्या फिश मार्केट येथे खेकड्यांचे आगमन होऊ लागले आहे.
पावसाळा सुरू झाला की दरवर्षी ग्रामीण भागातील महिला फिश मार्केट येथे रस्त्याकडेला रांगेने खेकडे विक्रीसाठी बसलेल्या दिसतात.
सदर महिलांकडील पोत्यात असलेले काळेभोर मोठ्याला नांगीचे खेकडे पाहून नवागत घाबरुन दूर जाईल. परंतु खेकडे प्रेमी खवय्ये मंडळी मात्र या महिलांकडे खेकडे खरेदीसाठी गर्दी करताना पहावयास मिळतात. गेल्या दोन दिवसापासून बेळगाव शहर परिसरात पावसाला सुरुवात झाली आपल्यामुळे खेकडे उपलब्ध होण्याचा मोसम सुरू झाला आहे.
फिश मार्केट येथे आज शुक्रवारी सकाळी खेकडे विक्री करणाऱ्या एका महिलेचे आगमन झाले. खेकड्यांच्या विक्रीसाठी आलेली ती पहिलीच महिला असल्यामुळे खरेदीसाठी तिच्याकडे गर्दी झाली होती.
सदर महिलेकडून खेकड्याच्या एका जोडीची विक्री 150 ते 200 रुपये दराने केली जात होती. या महिलेच्या आगमनाने खेकडे विक्रीच्या हंगामाची चाहूल लागल्यामुळे वर्षभर मटण -मासे खाऊन कंटाळलेली खवय्ये मंडळी उत्साहित झाली आहेत.