कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वांवर आर्थिक संकट कोसळले आहे अशातच खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक शुल्कात 5 ते 10 हजारांची वाढ केली आहे.
शिवाय शुल्क भरा अन्यथा ऑनलाइन अभ्यासक्रम दिला जाणार नसल्याचे सांगितले जात असल्याने पालकांची चिंता वाढली असून शिक्षण खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
मागील वर्षी मार्चमध्ये कोरोना प्रादुर्भावास सुरुवात झाल्यापासून पालकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. लाॅक डाऊन व इतर कारणामुळे व्यवसाय व नोकरी धंद्यावर परिणाम झाला असल्यामुळे पालकांना मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यास अडचणी आल्या. यासाठी अनेक पालकांनी वार्षिक शुल्कात सवलत देण्यात यावी किंवा टप्प्याटप्प्याने शुल्क भरून घ्यावे, अशी मागणी केली होती.
तथापि बऱ्याच शाळांनी शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत कोणत्याही प्रकारची सवलत दिले नाही. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 2020 -21 या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरले आहे.
आता लवकरच सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात तरी किमान वार्षिक शुल्कात सवलत मिळेल अशी पालकांची अपेक्षा होती. मात्र या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होण्यापूर्वी अनेक शाळांनी पालकांना शुल्कवाढीचा झटका दिला आहे.
शहरातील निम्म्याहून अधिक शाळांनी विविध कारणे देत शुल्कवाढ केली आहे. याकडे शिक्षण खात्याने तात्काळ लक्ष ठेवून संबंधित शाळांना वाढीव शुल्क कमी करण्याची सूचना करावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.