बेळगाव शहरातील 58 प्रभागांची प्रारुप मतदार यादी आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बेळगाव महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली आहे. या यादीबद्दल आक्षेप घेण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2021 ही आहे.
महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्वांना शहरातील 58 प्रभागांच्या प्रारुप मतदार यादीची प्रतीक्षा होती. सदर मतदार यादी आता प्रसिद्ध झाली असून त्यावर कांही आक्षेप असतील तर त्याची दखल घेतली जाणार आहे. यासाठी येत्या 1 जुलैपर्यंत लेखी आक्षेप नोंदविता येणार आहेत. महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडे आक्षेप नोंदवावा लागणार आहेत. त्या आक्षेपांची पडताळणी करून अक्षेप योग्य असतील तर मतदार यादीत बदल केले जाणार आहेत.
अंतिम मतदार यादी 9 जुलै 2021 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मात्र मतदार यादीत कोणतेही बदल केले जाणार नाहीत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीला विलंब झाल्यास त्यावेळी या मतदार यादीला जोड म्हणून पुरवणी मतदार यादी तयार केली जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेने प्रभागनिहाय मतदार यादी तयार करून त्याचे मुद्रण केले आहे. तीच मतदार यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिकडे बेळगावच्या नव्या प्रभाग पुनर्रचनेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल असताना त्याच प्रभागांनुसार मतदार यादी तयार करण्यात आली असल्याचे समजते.