मान्सूनपूर्व पावसाने आज सायंकाळी बेळगाव शहरासह तालुक्यात हजेरी लावली. पावसाच्या हजेरीमुळे हवेत गारवा निर्माण होण्याबरोबरच पेरण्या पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर परिसरात आज गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरणासह हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळी सहा सव्वासहाच्या सुमारास शहर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आजचा हा पाऊस पेरणीला उपयुक्त ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सध्या लॉक डाऊन सुरू असल्यामुळे शहरातील जनजीवनावर मात्र या पावसाचा कोणताही परिणाम झाला आला नाही. तथापि स्मार्ट सिटीच्या अर्धवट अवस्थेतील कामाच्या ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार गोव्यामध्ये 5 जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता कमी आहे. गोवा प्रदेशात वादळी वाऱ्यासह मान्सूनचे आगमन होण्यास अद्याप चार दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरला नाही तर गोव्यातील मान्सूनचे आगमन आणखी दोन-तीन दिवस लांबणार आहे.