ओसरत चाललेली कोरोनाची दुसरी लाट आणि राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट सुमारे 2 टक्के झाल्यामुळे कर्नाटक सरकारने एसएसएलसीची (इयत्ता दहावी) परीक्षा येत्या दि. 19 आणि 22 जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून यंदा 8.76 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री एस. सुरेशकुमार यांनी आज सोमवारी दुपारी सर्व जिल्हाधिकारी आणि जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केल्यानंतर उपरोक्त घोषणा केली. मागील वर्षी आम्ही 26 जून ते 3 जुलै अशी सहा दिवस एसएसएलसी परीक्षा आयोजित केली होती. यावर्षी भविष्यात विज्ञान, कला अथवा वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाची निवड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही परीक्षा घेत आहोत.
यंदाची परीक्षा दोन दिवसाची असेल गणित, विज्ञान आणि समाज शास्त्र या महत्त्वाच्या विषयांची परीक्षा 19 जुलै रोजी आणि भाषेची परीक्षा 22 जुलै रोजी घेतली जाईल. सदर परीक्षेसाठी ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न असतील आणि परीक्षेचे हॉल तिकीट येत्या 30 जूनपासून संबंधित शाळा मुख्याध्यापकांकडे उपलब्ध असतील, अशी माहितीही मंत्री सुरेशकुमार यांनी दिली.
परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिघात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी असेल. दोन्ही दिवस परीक्षेचा कालावधी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असेल. दरम्यान, पुढील आठवड्यापर्यंत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण खात्याकडून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना एन 95 फेसमास्क वितरित केले जातील. तथापि विद्यार्थी स्वतःचे मास्क अथवा फेस शील्ड वापरू शकतात. मात्र फेस मास्क चांगल्या दर्जाचे असावेत. परीक्षा केंद्रात सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा नियम पाळावा लागेल. परीक्षा वर्गात एका डेस्कवर एकच विद्यार्थी बसेल. या पद्धतीने प्रत्येक वर्गात फक्त 12 विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक नाही त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आली आहे असे सांगून मागील वर्षाच्या 8.46 लाख विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा 8.76 तर लाख विद्यार्थी एसएसएलसी परीक्षेला बसले आहेत. त्याप्रमाणे मागील वर्षाच्या 48000 केंद्राच्या तुलनेत या वर्षी 73,066 परीक्षा केंद्र स्थापण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी शेवटी दिली.