कर्नाटक सरकारकडून आता हाती घेतली जाणारी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम प्रारंभी फक्त सरकारी हॉस्पिटल मध्येच राबविली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. सुधाकर के. यांनी दिली आहे.
सरकारकडून उद्या सोमवार दि. 10 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे बेंगलोर येथील के. सी. जनरल हॉस्पिटल, जयनगर जनरल हॉस्पिटल, श्री सी. व्ही. रामन जनरल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ईएसआय हॉस्पिटल आणि निम्हस येथे ही लसीकरण मोहीम राबविली जाईल. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये प्रारंभी सदर लसीकरण तेथील जिल्हा हॉस्पिटल, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व तालुका हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असणार आहे. लसीची उपलब्धता जसजशी वाढत जाईल तस तशी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली जाईल आणि त्यासंबंधीची माहिती वेळच्या वेळी जाहीर केले जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले
ज्यांनी लसीकरणासाठी को -विन पोर्टलवर नांव नोंदणी केली आहे आणि वेळ ठरवून घेतली आहे अशा 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जाईल. नागरिकांना थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण करून घेता येणार नाही.
राज्यातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले पाहिजे या दृष्टीने सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून लस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील आहे. तेंव्हा सर्व नागरिकांनी खास करून युवा पिढीने संयम बाळगावा. प्रत्येकाचे लसीकरण होईल यासाठी सरकार दक्ष असून आपले लसीकरण होईल याची प्रत्येकाने खात्री बाळगावी, असेही मंत्री डॉ सुधाकर के. यांनी सांगितले.
कर्नाटक सरकारने कोविशिल्डच्या 2 कोटी डोस खरेदीची ऑर्डर दिली आहे. यापैकी 3.5 लाख डोस शनिवारी रात्री उपलब्ध झाले असल्यामुळे एकूण मिळालेले डोस 6.5 लाख इतके झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 1 कोटी 10 लाख 49 हजार 470 डोसांचा पुरवठा करण्यात आला असून यापैकी 99 लाख 58 हजार 190 डोस हे कोविशिल्डचे असून 10 लाख 91 हजार 280 डोस हे व्हॅक्सिनचे आहेत.