कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेचा सध्या विचका झाला आहे. राज्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुढील सूचनेची वाट पाहण्यास सांगण्यात आले असून 45 वर्षावरील ज्या नागरिकांना दुसरा डोस मिळायचा आहे ते वेगळ्याच पेचात सापडले आहेत.
दरम्यान ज्या लसीकरण केंद्रामध्ये लस उपलब्ध आहे, तेथे पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्यांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे जर कोणाला लस घ्यायची असेल तर त्यांचे पहिले लसीकरण गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेले असले पाहिजे. मात्र प्रत्यक्षात लसीकरण मोहिमेलाच 1 मार्चपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जर कोणी 1 मार्चला पहिला डोस घेतला असला तरी आतापर्यंत त्यांचे दिवस फक्त 77 भरणार असून ते दुसऱ्या डोससाठी अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांना दुसरा डोस मिळायचा आहे ते पेचात सापडले आहेत.
आणखी एक मुद्दा हा की, कोविन पोर्टलवर बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व स्लॉटस् बुक्ड अर्थात आरक्षित दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ही केंद्रे सध्या नागरिकांना अभावी ओस पडलेली दिसत आहेत.
याबाबत विचारणा केली असता लसीचा साठा आहे, परंतु कोवीनकडून लस देण्यास मनाई असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. कोवीशिल्डच्या दुसरा डोससाठी ज्यांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतली आहे ती वैध राहणार असून कोवीनकडून रद्द केली जाणार नाही. तथापि 60 वर्षावरील नागरिकांनी आतापर्यंत ऑनलाईन बुकींग केले नसल्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा’ या तत्त्वावर त्यांचे लसीकरण केले जात आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कोवीन डिजिटल पोर्टलमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी पहिल्या डोसनंतर 84 दिवसाचा कालावधी पूर्ण न केलेल्या लाभार्थींना ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष अपॉइंटमेंट मिळणार नाही.
तथापि ज्यांनी यापूर्वीच दुसर्या डोससाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतली आहे ती मात्र वैध राहणार असून कोविन ती रद्द करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पहिल्या डोस नंतर 84 दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना आपल्या अपॉइंटमेंटची तारीख बदलून घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.