महाराष्ट्रातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बेळगाव जिल्हा समन्वयपदी बेळगाव शिवसेनेचे नेते दत्ता जाधव यांची वर्णी लागली आहे. शिवसेना वैद्यकी कक्ष महाराष्ट्राचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तसे नियुक्तीपत्र जाधव यांना धाडले आहे.
सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात दत्ता जाधव यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विलगीकरण केंद्राला 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स शिवसेना वैद्यकीय कक्ष मुंबईच्या माध्यमातून मिळवून दिले होते.
त्याप्रमाणे आणखी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय मदत ते मिळवून देणार आहेत. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत दत्ता जाधव यांचे योगदान लक्षात घेऊन शिवसेना आरोग्य कक्ष महाराष्ट्राचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दत्ता जाधव यांची बेळगाव जिल्हा समन्वयक पदी निवड केली आहे.
दत्ता जाधव यांनी यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विलगीकरण केंद्राच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्यांच्या एकंदर कार्याचे सर्वत्र कौतुक होत होते.
शिवसेनेचे बेळगाव जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदींनी दत्ता जाधव यांची बेळगाव जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून दत्ता जाधव यांची वरीलप्रमाणे बेळगाव जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबद्दल शिवसेना बेळगावचे संघटक दत्ता जाधव यांचे सर्व थरांमध्ये अभिनंदन होत आहे.