सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या काळात गरीब सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल लक्षात घेऊन वन टच फाउंडेशन च्या माध्यमातून हनुमाननगर येथील घरकाम, धुणीभांडी आणि हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
आज देशात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले असून त्यामुळे सामान्य लोकांना जिवन जगणे मुश्किल झाले आहे. सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे ‘तुमचे सहकार्य, तुमची मदत, आमचे निस्वार्थ कार्य’ हे ब्रीद घेऊन शहरातील वन टच फौंडेशन जनसेवा करत आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी हनुमाननगर येथील घरकाम, हॉटेल काम, धुणीभांडी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या अश्विनी वंजारे, नयना पाच्छापुरे, अक्काताई शामखुडे, सुनिता खुडे, यशोदा खुराडे या गरजू महिलांनी जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.
सदर महिलांनी सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वन टच फाऊंडेशन ‘एक हात मदतीचा..’ जुना गुडसशेड रोड बेळगाव या संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल फोंडू पाटील यांच्याकडे मदत मागितली होती. तेंव्हा पाटील यांनी ताबोडतोब, या महिलाना 20 दिवस पुरेल इतके जीवनावश्यक आहारधान्य व साहित्य उपलब्ध करून दिले. सिव्हिल हॉस्पिटल रोड ज्योती काॅलेजसमोर जाऊन या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
विठ्ठल पाटील, सौ.माधुरी माळी यांच्या या प्रयत्नातून सदर उपक्रमासाठी संदीप मोरे व सौ. वृषाली मोरे यांचेकडून 10 कुटुंबांना तसेच सौ.निर्मला पवार, श्री.रामचंद्र शहापुरे, सौ.प्रिया आणि ॲड.सुधीर चव्हाण यांच्याकडून 8 कुटुंबांना अशा एकूण 18 कुटुंबांना किमान 20 दिवसतरी उदरनिर्वाह होईल, इतकी मदत देण्यात आली.
याप्रसंगी विठ्ठल फोंडू पाटील, उपाध्यक्ष संतोष गंधवाले, संचालिका सौ.वृषाली मोरे, शिल्पा केकरे, जयप्रकाश बेळगावकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, जर कोणी गरजू गरीब कुटुंब असेल त्यांनी 8884640133 या क्रमांकावर संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.