कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हेस्कॉमने देखील खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून कार्यालयात फक्त 50 टक्के कर्मचारीवर्गाला हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी हेस्कॉमच्या रेल्वे स्टेशन व नेहरूनगर येथील कार्यालयांमधील कांही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कांही दिवस संबंधित कार्यालय बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर खबरदारी घेत सदर कार्यालय पुन्हा सुरू झाली. आता कांही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेऊन हेस्कॉम कार्यालयातील महसूल व इतर विभागाच्या निम्म्या कर्मचार्यांना कार्यालयात येण्याची सूचना करण्यात आली आहे. उर्वरितांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला असून यामध्ये 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.
लाईनमनवर्गाला मात्र पूर्ण क्षमतेने कामावर हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हेस्कॉमकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये देखील घट झाली आहे. वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी लाईनमनना दिवस-रात्र कार्यरत राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे 50 टक्क्यापेक्षा कमी कर्मचारी असले तरी कामावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नसल्याचा दावा हेस्काॅमकडून करण्यात येत आहे. सध्या हेस्कॉम कार्यालयातील गर्दी देखील पूर्णपणे ओसरली आहे.
दरम्यान, सध्या फक्त 50 टक्के कर्मचार्यांना कार्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. मात्र कोरोनाचे संकट कमी होताच कर्मचाऱ्यांची संख्या पुन्हा वाढविली जाईल असे सांगून सध्या कामावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करूर यांनी दिली.