वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फॉर नीडी या संघटनेने पोलीस आयुक्तालयासह शहरातील पोलीस स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम स्वागतार्ह असल्याचे सांगून पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी आज हेल्प फॉर नीडीच्या सेवाभावी कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखालील हेल्प फॉर नीडी संघटनेतर्फे आज गुरुवारी जंतुनाशक औषध फवारणी करून पोलीस आयुक्तालय इमारत आणि परिसर निर्जंतुक करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून सुरेंद्र अनगोळकर हे अत्यंत प्रशंसनीय कार्य करत असल्याचे सांगितले.
हेल्प फॉर निडीतर्फे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या अटेंडर्ससह बस स्थानक, रेल्वे स्थानक व शहरातील गरीब -गरजू लोकांना सुमारे हजार भोजन पाकिटांचे मोफत वितरण केले जाते. त्यांची रुग्णवाहिका आणि शववाहिका देखील विनामूल्य सेवा देत आहे. याव्यतिरिक्त ऑटोरिक्षाद्वारे कोरोना रुग्ण तसेच अन्य आजारी लोकांना ते मोफत सेवा देतात.
आता त्यांनी बेळगाव पोलीस आयुक्तालयासह शहरातील सर्व पोलीस स्थानकांच्या ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
सध्याच्या संसर्गजन्य परिस्थितीत पोलिस कर्मचाऱ्यांच्या आणि याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्याने हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे असे सांगून पोलीस उपायुक्त डॉ. आमटे यांनी पोलीस प्रशासनातर्फे सुरेंद्र अनगोळकर यांना धन्यवाद दिले.