हंगरगा (ता. जि. बेळगाव) गावामध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याकारणाने या रोगाची साखळी तोडण्यासाठी उद्या मंगळवार दि. 18 मे पासून येत्या सोमवार दि. 24 मेपर्यंत गावामध्ये सलग सात दिवसाचा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. हंगरगा गावकमिटी आणि ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.
हंगरगा गावातील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये आज सोमवारी गावकमिटी, ग्रामपंचायत सदस्य आणि ज्येष्ठ मंडळींची बैठक पार पडली.
या बैठकीतील चर्चेअंती हंगरगा गावामध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याकारणाने गावातील या रोगाची साखळी तोडण्यासाठी दि. 18 ते 24 मे 2021 या कालावधीत एकूण सात दिवस गावामध्ये संपूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि आजारी व्यक्तींवरील उपचारासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी लॉक डाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त गावातील कोणीही लॉक डाऊनच्या काळात घराबाहेर पडू नये. तसेच बाहेरील व्यक्तींना गावात येण्यास निर्बंध घालण्याचे असे बैठकीत ठरविण्यात आले.
त्याचप्रमाणे फेसमास्क नसताना घराबाहेर पडल्यास 500 रु. दंड तसेच लॉक डाऊनचा नियम मोडल्यास आणि परगावच्या व्यक्तींनी गावात प्रवेश केल्यास 5000 रु. दंड ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस गावकमिटीच्या सदस्यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ज्येष्ठ जाणकार मंडळी उपस्थित होती.