बेळगाव शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधील उपचाराचा दर एकच ठेवावा आणि तो देखील वाजवी असावा, सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारावा आणि अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने दाखल करून घेतले जावे, अशी मागणी शहरातील माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील माजी नगरसेवकांच्यावतीने अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी आज बुधवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटल्सकडून कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी एक ठराविक निश्चित दर आकारण्या ऐवजी मनमानी अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे.
गेल्या वर्षीपासून लाॅक डाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. काम नसल्यामुळे आर्थिक चलनवलन ठप्प झाले आहे. परिणामी हॉस्पिटलचा खर्च भागविण्यासाठी नागरिकांना कर्जे काढावी लागत आहेत किंवा स्थावर मालमत्ता विकावी लागत आहे. तेंव्हा शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्समधील उपचाराचा दर एकच आणि तोही वाजवी परवडेल असा निश्चित करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.
दुसरी गोष्ट म्हणजे कांही खाजगी हॉस्पिटल्स रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची मागणी करत आहे. ज्याला काहीच अर्थ नसून यामुळे केवळ पैसे व वेळेचा अपव्यय होत आहे त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील कारभार सुधारावा आणि तेथील बेड्सची संख्या वाढवावी. तसे झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना खाजगी हॉस्पिटल्सकडे जाण्याची वेळ येणार नाही.
सरकारी नियमानुसार कोरोनाग्रस्त रुग्णावर घरात उपचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र आयसोलेशन वॉर्डमध्ये 10 खाली एचआरसिटी स्कोर असलेल्या रुग्णांनाच दाखल करून घेतले जात आहे. त्यामुळे एचआरसिटी स्कोर 10 च्या वर असलेल्यांनी काय करायचे? कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये परवानगी नाही आणि घरीही उपचार घेता येणार नाही. तेंव्हा कृपया 10 पेक्षा जास्त एचआरसिटी स्कोर असलेल्यांना देखील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करून घेतले जावे. तसेच रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आणि आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली जावीत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक राकेश पलंगे, संजय शिंदे, राजू बिर्जे आदी बऱ्याच नगरसेवकांच्या स्वाक्षर्या आहेत. दरम्यान, कोणीही रुग्ण असतील तर मला सांगा त्यांना मी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य उपचाराची व्यवस्था करून देतो असे आश्वासन जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ यांनी आपल्याला दिले असून सध्या विविध ठिकाणी 60 बेड रिक्त असल्याचे माहितीही त्यांनी दिल्याचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे गरजूंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीचा लाभ घ्यावा, किंवा 08312436960 येथे संपर्क साधावा असे आवाहनही केले.रुग्णाने आधार कार्ड,एचआरसीटी रिपोर्ट आणणे आवश्यक आहे