होनगा येथील एएसपीएल व काकती (ता. बेळगाव) येथील बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही ऑक्सिजन प्रकल्पांना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
सदर भेटीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी या ऑक्सिजन प्रकल्पांची एकूण क्षमता, त्यांच्यातर्फे हॉस्पिटल्सना होणारा ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा आणि शिल्लक साठा याची माहिती घेतली. दररोज लागणारा ऑक्सिजन सिलिंडरचा साठा आणि शिल्लक राहिलेला साठा या संदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना केली.
सध्या ऑक्सिजनची अत्यंत गरज असल्याने कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन कमतरता निर्माण होऊ नये यावर लक्ष द्या, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
होनगा आणि काकती येथील दोन्ही ऑक्सीजन प्रकल्पांच्या संचालकांशी देखील जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी चर्चा केली आणि ऑक्सिजन उत्पादनाची एकंदर परिस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, ईश्वर उळागड्डी, निस्सार अहमद आदी उपस्थित होते.