कोरोना उपचाराच्या बाबतीत जिल्हा हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटलची वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून येथील कारभार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप शहरातील भाजप नेते किरण जाधव यांनी केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बीम्स हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा आणि त्या अनुषंगाने संबंधित अन्य बाबींबाबत बेळगाव लाइव्हशी बोलताना किरण जाधव यांनी उपरोक्त आरोप केला. बीम्समध्ये सध्या जो कारभार सुरु आहे तो अत्यंत निंदनीय आहे.
एखाद्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये चक्क 10 हजार रुपयांची मागणी केली जाते. याउलट सेवाभावी संघटनेचे कार्यकर्ते विनामोबदला रुग्णसेवा आणि अंत्यसंस्कार करत आहेत ही प्रशंसनीय बाब आहे असे सांगून कोरोनाग्रस्तांवरील अंत्यसंस्कारासाठी आता जिल्हा प्रशासनाने देखील पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे असे जाधव यांनी सांगितले.
बीम्सच्या कारभारावर टीका करण्याबरोबरच किरण जाधव यांनी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या आकड्याबाबत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचेही सांगितले. ते म्हणाले काल एकट्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 7 जणांचे कोरोनामुळे निधन झालेले असताना प्रशासनाने मात्र जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा अवघा 14 जाहीर केला आहे. याचा अर्थ कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे बळी जात आहेत हे सर्वश्रुत असताना प्रशासनाने मिलिटरी हॉस्पिटल वगळता जिल्ह्यात फक्त सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जाहीर करून दिशाभूल चालविले आहे, असे म्हणण्यास वाव आहे.
कोरोनाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी सरकारी अधिकारी व्यवस्थित काम करत नाहीत असा स्पष्ट आरोप करून त्यातल्या त्यात ‘बीम्स’मध्ये तर अनागोंदी कारभार सुरू आहे. स्वतः या हॉस्पिटलमध्ये जाऊन किती अधिकाऱ्यांनी कोरोना बाधितांची चौकशी केली? हे मला दाखवून द्यावे. मागील वर्षी जे विद्यार्थी डॉक्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत असे पदव्युत्तर शिक्षण घेणारे पीजीचे नवखे डॉक्टर्स सध्या बीम्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
फक्त रुग्णच नव्हे तर या डॉक्टरांकडे देखील बीम्सच्या प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अत्यावश्यक असणारे पीपीई किट नसताना हे बिचारे डॉक्टर्स जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत. त्यांच्यासाठी चांगली खाण्यापिण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. अंदाधुंदी कारभार सुरू असलेल्या या हॉस्पिटलवर चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावा. जेणेकरून तो 24 तास जनतेसाठी उपलब्ध असेल, अशी मागणी मी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अशी माहिती किरण जाधव यांनी यावेळी दिली.
बेळगाव महापालिकेकडे वैद्यकीय ज्ञान जास्त नाही. तथापि सध्याची प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी वाॅर्डांमधील पूर्वीची जी बंद पडलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत ती सुरळीत सुरू करावीत आणि तेथे कोवीड केंद्रे निर्माण करावीत. यासंदर्भात मी मंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे असे सांगून शहरात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांची माहिती जाधव यांनी दिली.
मागील वर्षी खासदार सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नांमुळे रोटरी क्लबकडून बिम्स हॉस्पिटलला मिळालेली 34 व्हेंटिलेटर्स अद्याप वापरात आणलेले नाहीत ते वापरात आणले जावेत. त्याचप्रमाणे हॉस्पिटल समोर जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे ते सध्या आहे त्या स्थितीत सुरू केल्यास कोरोनाग्रस्तांवर अधिक वेगाने उपचार होऊ शकतील, शिवाय बेड्सच्या तुटवड्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असेही भाजप नेते किरण जाधव यांनी स्पष्ट केले.