ऑटोनगर येथील केसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमनंतर आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाची भर बेळगावच्या क्रीडा क्षेत्रामध्ये पडणार असून येळ्ळूर नजीकच्या 60 एकर जागेमध्ये पुण्यातील बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या धर्तीवर हे संकुल उभारण्यात येणार आहे.
राज्य योजना क्रीडा खात्याचे आयुक्त के. श्रीनिवास यांनी स्थानिक आमदार आणि क्रीडा अधिकाऱ्यांसह नुकतीच येळ्ळूर येथील जमिनीची पाहणी केली असून क्रीडासंकुलासाठी सदर जागेला मान्यता दिली आहे. या 60 एकर जमिनीपैकी 20 एकर जागा स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहे, तर उर्वरित 40 एकर जमिनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे. नियोजित क्रीडासंकुलासाठी एकंदरीत 800 कोटी खर्च अपेक्षित आहे.
सदर क्रीडा संकुलामध्ये ॲथलेटिक ट्रॅकसह फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खोखो, हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, बॉल बॅडमिंटन, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, टेबल टेनिस कोर्ट, कुस्ती, बॅडमिंटनसह इतर विविध खेळांची मैदाने निर्माण करण्यात येणार आहेत.
या मैदानांसोबतच प्रशिक्षक आणि खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्र देखील उपलब्ध केले जाणार आहे. सदर संकुलाची उभारणी झाल्यास ते दक्षिण भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल ठरणार आहे.
दरम्यान, एका तज्ञ पथकाने सदर जागेची पाहणी करून जागेचे सपाटीकरण व इतर कामांचा आराखडा तयार करून तो राज्य शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनामुळे या कामात सध्या अडसर आला आहे.