सध्याच्या लॉक डाउनच्या काळात भाडे थकल्यामुळे घरमालकाने घराबाहेर काढलेल्या बेघर असहाय्य माय लेकास महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाने माणुसकी दाखवत आश्रय केंद्रात आसरा मिळवून दिल्याची घटना आज बुधवारी दुपारी शहापूर येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मंजुनाथ लक्ष्मण सावंत आणि शांता लक्ष्मण सावंत हे दोघे मायलेक जोशी गल्ली शहापूर येथे भाड्याच्या घरात राहत होते. मंजुनाथ हा शहापूर खडेबाजार येथील एका दारू दुकानांमध्ये कामाला होता. मात्र कोरोना प्रादुर्भाव आणि लाॅक डाऊनमुळे कामगार कपात करताना दारू दुकानदाराने मंजुनाथला कामावरून कमी केले होते. त्याचप्रमाणे त्याची आई शांता पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे दीड -दोन महिने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होती.
त्यामुळे तीन महिन्यापासून त्यांनी घरभाडे भरले नव्हते. वारंवार मागणी करूनही देखील घरभाडे मिळत नसल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवून शांता घरी परतताच घर मालकाने आज सकाळी तिला तिच्या मुलासह घराबाहेर काढले.
बेघर झालेले मंजुनाथ आणि शांता हे दुपारी आपले सर्व सामान घेऊन असहाय्य अवस्थेत बसवेश्वर सर्कल शहापूर येथे एका दुकानाच्या कट्ट्यावर बसले होते. तेंव्हा म. ए. युवा समितीचे कार्यकर्ते अहमद रेशमी आणि समितीचे नेते मदन बामणे यांनी त्या दोघांची विचारपूस केली. तसेच लाॅक डाऊन असल्यामुळे तिथून जात असलेले महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पाटील यांच्याकडे मदत मागितली.
तेंव्हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाटील यांनी तात्काळ मदतीसाठी तयार होऊन पुढाकार घेतला. त्यानंतर मंजुनाथ व त्याची आई शांता यांना घेऊन ते जुने बेळगाव येथील नगर वस्ती रहित आश्रय केंद्रात गेले.
मात्र त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी प्रारंभी कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करून शांता व मंजुनाथ यांना आश्रय केंद्रात दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर संजय पाटील यांनी स्वतःचा आणि आपल्या वरिष्ठांचा परिचय करून देताच त्या माय लेकास आश्रय केंद्रात दाखल करून घेण्यात आले.