बेळगाव जिल्हा प्रशासनाने काल घेतलेला ऑक्सिजन सिलेंडर बद्दल चा निर्णय म्हणजे रुग्णांच्या नाकावरचे ऑक्सिजन कॅप काढून घेण्यासारखेच आहे. एनजीओ अर्थात समाजसेवी संघटनांना ऑक्सिजन देऊ नये हा आदेश सध्या वादात अडकला असून हा घोळ संपवावा अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.
कोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत घरा घरात पोहोचून रुग्णांना श्वास पुरविण्यात एनजीओ आणि सामाजिक संघटनांचे योगदान महत्वाचे आहे. या संघटनांनी जर वेळेत ऑक्सिजन पुरवले नसते तर अनेक जण मृत्युमुखी पडले असते पण याचे भान न बाळगता जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय संतापाचा धनी ठरत आहे.
अतिशय वाईट परिस्थिती आहे. नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्यास ऑक्सिजन लेव्हल ठीक ठेवण्यासाठी ऑक्सिजन हे एकमेव उत्तर आहे. शहरात इस्पितळांमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. अशावेळी एनजीओ चे काम रोखले गेल्यास हाहाकार माजणार आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक करू नये.
सध्या अनेक संस्थांनी ऑक्सिजन च्या जीवावर अनेक रुग्णांना घरातच जगविले आहे. हजारो रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, आता त्यांना ही सुविधा पूर्ण बरे होण्यापर्यंत देण्याची गरज आहे.
काही सेवाभावी संस्थांनी स्वताचे डॉक्टर नेमून उपचार सुरू केले. स्वतःच्या खर्चाने ऑक्सिजन सिलेंडर भरून आणून मोफत उपचार करत आहेत. गरीब रुग्णांना हॉस्पिटल चा खर्च परवडत नसल्याने ही सेवा देण्यात येत असून अनेकांना उपचार मिळत आहेत.6
सध्या #NGONeedO2 आणि #Belgaumnedso2 या मोहिमेतून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न सूरु आहे. प्रशासन लवकर जागे झाले नाही तर मात्र ही मोहीम अधिक व्यापक करावी लागणार आहे.
तरुणांनी ट्विटर च्या माध्यमातून सुरू केलेल्या मोहिमेला बड्या अधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून यातून नक्कीच काही चांगले होईल अशी आशा आहे.