बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा महत्वाचा मार्ग म्हणजे ‘कॉलेज रोड’! परंतु गेल्या दोन – तीन वर्षात या रोडची दुर्दशा झाली आहे. संपूर्ण शहराचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास झाला. परंतु कॉलेज रोड मात्र दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे.
बेळगावच्या विकासाला सुरुवात झाली, त्यावेळी सर्वप्रथम कॉलेज रोडचे मास्टर प्लॅन करण्यात आले. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षात बेळगावचे वैभव असणारा कॉलेज रोड मात्र दुरावस्थेत आहे. येथील पथदीप अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहेत. शहरातील प्रमुख मार्गांपैकी महत्वाचा असणारा हा भाग अंधाराच्या विळख्यात अडकला आहे.
या मार्गावर असणाऱ्या दुभाजकावर असणाऱ्या झाडांचीही निगा योग्यरितीने राखण्यात येत नसल्यामुळे झाडाच्या फांद्या अस्ताव्यस्तपणे वाढल्या आहेत. यामुळे अत्यंत कमी संख्येत असणाऱ्या पथदीपांचा प्रकाश या झाडाच्या फांद्यांमध्ये झाकोळला जात आहे.
या भागात असणाऱ्या शोरूम्स आणि इतर काही कार्यालयांमुळे संध्याकाळी ७.३० ते ८.०० या दरम्यान या मार्गावर प्रकाश असतो. मात्र शोरूम्स आणि हि कार्यालये किंवा इतर दुकाने बंद झाल्यानंतर पुन्हा हा संपूर्ण मार्ग अंधारमय होतो. रात्री अंधारमय परिस्थितीतीमुळे या मार्गावरून जाणाऱ्या महिला अडचणींचा सामना करत असतात.
संपूर्ण शहराचा स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास होत आहे. अनेक ठिकाणी डेकोरेटिव्ह लाईट्स, रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटीकरण करण्यात आले आहे. परंतु कॉलेज रोड हा केवळ सकाळच्या सत्रात मोर्चे आणि मिरवणुकीपुरता मर्यादित राहिला आहे. राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर, केएलई रुग्णालयापासून ते हॉटेल रामदेव पर्यंतचा रस्ताही प्रमुख मार्गांपैकी एक आहे. परंतु हा भाग सुसज्ज झाला आहे. त्यामानाने कॉलेज रोड मात्र अद्यापही दुर्लक्षित आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणारा कॉलेज रोड हा महत्वाचा मार्ग आहे. याच मार्गावरून गोवा, महाराष्ट्रातून अनेक ग्राहक बाजारपेठेत जातात. याचठिकाणी ट्राफिक पोलिसांचा ससेमीराही या नागरिकांना झेलावा लागत आहे. ट्राफिक पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक ग्राहक बेळगावच्या बाजारपेठेकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे बेळगावमधील बाजारपेठेवर तसेच व्यवसायांवर परिणाम होत आहे. आणि पर्यायाने शासनाच्या महसूलावरदेखील परिणाम होत आहे.
एकेकाळी शहराचे वैभव असणारा हा मार्ग, शहराच्या सौंदर्यात भर पडणारा हा मार्ग आता अनेक असुविधेच्या कचाट्यात सापडला आहे. या मार्गावरील असुविधा दूर करून पुन्हा या मार्गाला गतवैभव प्राप्त करून देणे, गरजेचे आहे.