काल शुक्रवारी रात्रीपासून विकेंड कर्फ्यू या नांवाने कर्नाटक राज्यात 72 तासांच्या कडक लॉक डाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सक्तीची विश्रांती मिळाली असली तरी कांही जणांचे काम मात्र नेहमीप्रमाणे सुरूच आहे.
विकेंड कर्फ्यू अर्थात लॉकडाउन दरम्यान शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस दिवस-रात्र सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. या लॉकडाउनमुळे शहरातील, गावातील सर्व व्यवहार 72 तासासाठी बंद राहणार आहेत.
त्यामुळे आज शनिवार सकाळपासून सर्व रस्त्यांवर शुकशुकाट आहे. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासमवेत आपापल्या घरांमध्ये बसून आहे. मात्र याला काही लोक अपवाद असतो जे या लॉकडाउनच्या काळात देखील आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त आहेत.
आज सकाळपासून आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, रस्त्यावर कचरा गोळा करून आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याऱ्या महिला आपापली कामे करताना पहावयास मिळत होते. आज सकाळी स्वच्छता कर्मचारी शहरातील आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी रस्त्यांची झाडलोट करणे, कचरा एकत्रित करणे, एकत्रित केलेला कचरा कचरा गाडीत टाकणे वगैरे सफाईची कामे करताना दिसत होते.
जीवनावश्यक बाबींमध्ये पेट्रोल पंप देखील असल्यामुळे पेट्रोल पंपावर देखील कर्मचाऱ्यांचा वावर दिसत होता. तथापि कर्फ्यूमुळे जीवनावश्यक वस्तू आणि साहित्यांची वाहतूक करणारी वाहने वगळता अन्य कोणत्याही वाहनांची रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे जे पेट्रोल पंप नेहमी गजबजलेले दिसायचे त्याठिकाणी आज शुकशुकाट पहावयास मिळत होता.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या आरोग्य कर्मचारी उसंत न घेता कामाला लागले आहेत. कर्फ्यू असला तरी प्रत्येक हॉस्पिटल आणि दवाखान्यामधील आरोग्य कर्मचारी आज आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते.
पोलीस कर्मचारीदेखील काल रात्रीपासून अधिक सतर्क आणि कठोर होऊन आपले कर्तव्य बजावताना दिसत होते. विकेंड कर्फ्यूच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.