कोरोना प्रादुर्भाव थोपविण्यासाठी कर्फ्यूची अंमलबजावणी करताना टिळकवाडी येथील पहिल्या आणि तिसरे गेट बंद करण्यात आल्यामुळे दुसऱ्या रेल्वे गेटवरील रहदारीचा ताण वाढला असून या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता थोपविण्यासाठी येत्या 12 मेपर्यंत सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतचा कालावधी वगळता उर्वरित संपूर्ण दिवस राज्यभरात कर्फ्यूचा आदेश जारी करण्यात आला आहे. बेळगावातही याची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून संचार बंदीसाठी ठिकाणांचे मार्ग बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आले आहेत.
टिळकवाडी येथील पहिले आणि तिसरे रेल्वे गेट देखील या पद्धतीने बंद करण्यात आले आहे. तथापि यामुळे येथील दुसऱ्या रेल्वे गेटवरील रहदारीचा ताण वाढला असून या ठिकाणी सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सदर वाहतूक कोंडीमुळे येथील काँग्रेस रोडसह हेरवाडकर हायस्कूल समोरील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.
काँग्रेस रोडवर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे शहरातून उद्यमबागकडे आणि उद्यमबाग परिसरातून शहराकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे उद्यमबाग येथे कामाला जाणाऱ्या कामगारांवर कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचण्याची वेळ येत आहे.
त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीमुळे तातडीच्या वैद्यकीय अथवा रुग्ण सेवेमध्ये देखील अडथळा निर्माण होत आहे. तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन पहिले रेल्वे गेट वाहतुकीसाठी खुले करावे, जेणेकरून दुसऱ्या रेल्वे गेटवरील रहदारीचा ताण कमी होईल, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.