लोकसभा पोटनिवडणुक लढविणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. धामणे, येळ्ळूर आणि आजूबाजूच्या गावात प्रचारासाठी गेलेल्या सतीश जारकीहोळींनी प्रचारसभेत विरोधकांना धारेवर धरत आपला विजय नक्की असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
यावेळी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर सतीश जारकीहोळींनी जोरदार टीका केली. काँग्रेस सरकारची सत्ता असताना राज्यात अनेक विकासकामे करण्यात आली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या विरोधी पक्षाने विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
सातत्याने होत असलेल्या दरवाढीवरदेखील सरकारला लक्ष्य केले. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना जनतेचा विचार करण्यात यायचा. जनतेच्या सोयीसाठी सर्व कायदे अंमलात आणले जायचे. परंतु सध्याचे सरकार सर्वच गोष्टी जनविरोधी करत असल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकार जेव्हा अस्तित्वात आले तेव्हापासून जातीवाद, धर्माच्या नावावर राजकारण सुरु आहे. २०१५ च्या भाषणात मोदींनी केवळ घरापुरता विचार करून भाषण केले. देशातील जनतेचा त्यांनी विचार केला नाही. केवळ रामराज्य निर्माण करण्याचे गाजर दाखवून विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे, अशी टीका सतीश जारकीहोळींनी केली.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत विविध दृष्टिकोन ठेऊन निवडणूक लढविणार असून, येथील जनतेच्या सर्व सोयी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, कामगार, अनुसूचित जाती जमाती, रेल्वेसेवा, रस्ते यासह सर्व मूलभूत सुविधांचा विचार करून प्रत्येक घटकाचा विकासासह बेळगावचा विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सतीश जारकीहोळींनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल आणि आपला विजय निश्चित आहे, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.