Saturday, January 11, 2025

/

नाईट कर्फ्यू आणि अचानक लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांना

 belgaum

देशासह कर्नाटकात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूची घोषणा केली.

परंतु अचानकपाने अत्यावश्यक सेवा वगळता राज्य सरकारने नवी मार्गसूची जाहीर करून अनेक व्यवहार बंद करण्यास सांगितले. शहर परिसरात अचानकपणे पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे अनेक ठिकाणची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. दरम्यान अनेक छोट्या व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

रस्त्यावर फळ, भाजी, आणि इतर साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला. नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊन ची घोषणा असूनही अचानकपणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अचानकपणे शहरातील व्यवसाय आणि दुकाने बंद झाल्याने नागरिकांची भलतीच तारांबळ उडाली.

दरम्यान, याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, काही दुकानांमध्ये गर्दी दिसून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु शुक्रवारीही शहर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता मोठ्या प्रमाणात व्यवसाय बंदच दिसून आले. कोरोना नियमावलीचे पालन होत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.

वर्षभर कोरोना परिस्थितीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोना रुग्णांची संख्या मंदावत चालली असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक घडी बसविण्यासाठी सर्वसामान्य जनता कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तजवीज करण्यात मग्न होती. परंतु अचानकपणे पुन्हा एकदा कोविड रुग्णांच्या संख्येचा स्फोट झाल्याने शासनाने विकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि मिनी लॉकडाऊन सारखा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून अचानकपणे जाहीर केलेल्या या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. हाताच्या पोटावर राबणाऱ्या हातांचेही गेल्या दोन दिवसात हाल झाले आहेत. हा निर्णय जरी जनतेच्या हितासाठी घेण्यात आला असला, तरी सर्वसामान्य जनतेची भंबेरी या निर्णयामुळे उडाली आहे.

गुरुवारी सकाळी बाजारपेठेतील भाजी विकेत्यांचे मैदानावर स्थलांतर करण्याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. दरम्यान याचवेळी पोलिसांनी दडपशाहीने दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्याने बाजारपेठेत व्यावसायिकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची धांदल उडाली. वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जीवनाचा गाडा रेटू पाहणाऱ्या सर्वसामान्यांना पुन्हा एकदा लॉकडाऊनची झळ बसणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.