महाराष्ट्र एकीकरण समिती ही म्हाताऱ्यांची संघटना आहे. सीमाप्रश्नाचे राजकारण करून काही नेते आपली पोटं भरून घेतात. आपले अस्तित्व टिकवणारे जुनाट नेते सोडले तर या संघटनेशी कुणाचा संबंध नाही. त्यांच्यात मोठी फूट आहे त्यांचं काहीच होणार नाही. समितीशी आणि सीमाप्रश्नाशी तरुणांचा काही संबंध नाही किंवा सगळ्यात शेवटी समिती संपली.
ही वाक्ये ऐकून ऐकून कंटाळलेल्या सगळ्यांनाच मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आणि एप्रिल महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा फक्त आठवला तरी अंगात रक्त सळसळल्याचा अनुभव येत असेल. आणि १७ एप्रिल हा या प्रक्रियेतला शेवटचा दिवस आठवला की अजूनही अंगावर काटे उभे राहतात. समितीच्या इतिहासात अनेकवेळा नवचैतन्य निर्माण होणाऱ्या घटना घडल्या आहेत, पण यावेळी नवचैतन्य नव्हे तर क्रांती घडली आहे. आणि या क्रांतीत आता सातत्य बाळगणे महत्वाचे आहे.
शुभम शेळके या तरुणाने इतिहास घडविला आहे. हा इतिहास प्रत्येक सीमावासीयांच्या दृष्टीने एक महत्वाचा अध्याय ठरला आहे. सीमाभागाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा हा काळ गेला, निवडणुकीच्या दिवशी तर राष्ट्रीय पक्षांचे खास मतदार बाहेरच पडले नाहीत. आणि जे बाहेर पडले त्यापैकी बरेचजण बाहेर पडले समितीच्या सिंहासाठी.
अनेक वर्षात निवडणुकीच्या निमित्ताने समितीला असा अनुभव आला असेल. नाहीतर दरवेळी या गटाला टाकू की त्या गटाला या प्रश्नात मराठी मतदार घाल कुत्र्याला असे म्हणत कुणाला तरी मतदान करत होता.
यावेळी वातावरण बदलले याला शुभम शेळके निमित्त झाले. त्याला विरोध पत्करावा लागला. आतून बाहेरून विरोध होताना, राजकारणी लोकांनी आरोप सुद्धा केले. या आरोपांना तोंड देत देत त्याने जो इतिहास केला यामध्ये समर्थनात थांबलेल्या अनेक मावळ्यांचे सहकार्य मोलाचे आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात असो वा उत्तर आणि दक्षिण मध्ये, जे कोणी मतदारसंघात बाहेर पडले त्यापैकी 70 ते 80 टक्के लोक समितीला मतदान करणारे ठरले हे अभिमानाने सांगावे लागेल.
आता इतिहास घडला म्हणून शांत बसू नका, आता नवचैतन्य टिकवून ठेवण्याची गरज आहे. आता जुन्या विचारांना मार्गदर्शकांच्या भूमिकेत घेऊन नवीन विचारांचे नेतृत्व पुढे यायला हवे. पुढे येणाऱ्या मनपा, ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि आमदारकीच्या निवडणुकीत आता हेच उदाहरण पक्के व्हायला हवे. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत समितीचा आवाज घुमणे गरजेचे असेल तर लोकसभा पोटनिवडणूक पॅटर्न सीमाभागात रुजण्याची गरज आहे.