महाराष्ट्रात मागील 5 वर्षे सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे दुर्लक्षच केले होते. आता भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे येऊन मराठी भाषिकांवर बरोबर आपण नाही आहोत हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
बेळगाव येथे कांही खाजगी कामानिमित्त आले असता बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी हॉटेल मेरियट येथे ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि माननीय शरद पवार साहेब यांचे जुने संबंध आहेत. या भागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र यावे असा आमचा नेहमीच आग्रह राहिला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने समस्त मराठी भाषिकांचे पुन्हा एकदा एकत्रीकरण झाले आहे. महाराष्ट्राला जोडले जाण्याच्या त्यांच्या इच्छेचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्रातील सर्वांचाच शुभम शेळके यांच्या उमेदवारीला पाठिंबा आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
बेळगावात येऊन भाजप उमेदवाराचा प्रचार करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, फडणवीस नेहमीच दिलेश्वरांना खूष करण्याच्या प्रयत्नात असतात. दिल्लीला बरं वाटेल असे बोलण्याची आणि वागण्याची त्यांची पद्धत आहे. शिवाय मागची पाच वर्षे महाराष्ट्रात भाजप सत्तेवर असताना त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येथील मराठी भाषिकांच्या मागण्या आणि अपेक्षांकडे दुर्लक्षच केले आहे. आता आपण मराठी भाषिकांबरोबर नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. खरे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल जी एक भावना असणे आवश्यक आहे, ती मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्याकडे दिसायला हवी होती. पण ती दिसली नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी येथे येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात भूमिका घेणे टाळायला हवे होते असेही पाटील म्हणाले.
सीमाभागात जुने नेते आणि नवी पिढी एकत्र येऊन शुभम शेळके यांच्या रूपाने संघर्ष करू इच्छिते. त्यांचा एक चांगला मिलाफ झाला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की मराठी भाषिकांची एक भावना आहे त्याला छेद देण्याचे काम त्यांनी येथे येऊन केले आहे, असे असे जयंत पाटील पुढे म्हणाले.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेले नाही, या फडणवीसांच्या वक्तव्याबद्दल बोलताना खासदार संजय राऊत हे याचे प्रत्युत्तर आपल्या सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांना निश्चितपणे देतील असे सांगून या देशांमध्ये अशा पद्धतीने बुद्धीभेद करण्याचे काम आणि धार्मिक गोष्टींचे संदर्भ जोडून मते मागण्याची गरज आजही भाजपला वाटते याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला अद्यापही जनाधार मिळालेला नाही. राहिला पक्ष शिवसेनेचा शिवसेनेची भूमिका नेहमी स्पष्ट राहिली आहे. त्यांचे नेते ती मांडत असतात, असेही मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील मंगळवेढा येथे निवडणूक सुरू असल्यामुळे आपल्या पक्षाचे प्रमुख नेते महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी येऊ शकले नाहीत. मात्र या निवडणुकीत समितीला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितले.