राज्यासह आता बेळगाव जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी प्रशासन उपाययोजना करत असून प्रामुख्याने गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहे. सध्या लग्नाचा सिझन सुरु झाला असून लग्नसोहळ्यात शेकडोंच्या संख्येने गर्दी होते. परंतु मागील वर्षीप्रमाणेच यंदाही लग्नसमारंभावर कोरोनाचे सावट पडले असून कोरोना मार्गसूचीनुसार लग्नसोहळा करण्यासाठी सरकारी परवानगी आणि कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे न केल्यास वऱ्हाडी मंडळी समवेतच सरकारी अधिकारी देखील मंडपात येऊ शकतात, याचे भान ठेवावे लागेल.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी सोमवारी आपल्या कार्यालयात विविध अधिकाऱ्यांची विडिओ कॉन्फरेन्स घेतली. यावेळी मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांच्यासह सरकारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी पालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारच्या आदेशानुसार बेळगाव शहरात जनतेला मास्कचा वापर बंधनकारक आहे. मॉल, बाजारपेठ, दुकाने अशा अनेक ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफआयआर नोंदवून संबंधित मॉल, आस्थापनांना टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. शिवाय लग्नसमारंभात कोविड मार्गसूचीचे पालन करण्यात येत आहे कि नाही? यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना थेट लग्नमंडपात भेट देण्याचीही सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलीस खात्याच्या सहाय्याने आजपासून कोरोनाविरोधात तीव्र मोहीम राबवण्यात येईल. शहरात लसीकरणाचा वेग वाढवण्याची आणि जेथे गर्दी होते अशा, लग्न व अन्य सभा-समारंभ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मॉल यासह गर्दीच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी योग्य ते उपाय योजण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आताच आम्हाला सूचना दिल्या आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीनंतर सर्व सूचना काटेकोर पाळण्याचे आदेश देण्यात आले असून मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याआधी प्रवेशाची जशी व्यवस्था केली होती, तशीच व्यवस्था आताही त्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून करण्यात येईल. किरकोळ भाजी विक्रेत्यांना खुल्या मैदानात भाजी विक्री करण्याची व्यवस्था करून देण्यात येईल असे ते म्हणाले.
सरकारी परवानगीशिवाय कोणत्याही मंगल कार्यालयात लग्नसोहळा आयोजित करता येणार नाही. लग्नाच्या कार्यालयात किंवा मंडपात आमचे अधिकाऱ्यांचे पथक भेट देऊन कोविड नियम पालनाबाबत पाहणी करेल. त्यांच्याकडील आदेशात पथकात कोणते अधिकारी असतील, विडिओग्राफर असेल याबाबत उल्लेख असेल. शिवाय लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाच्या नावाची यादी दिल्यावरच परवानगी देण्यात येईल. असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.