बेळगाव जिल्ह्यामध्ये आज गुरुवार दि. 29 एप्रिल रोजी नव्याने आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 545 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 2,822 इतकी वाढली आहे.
जिल्ह्यात उपचारअंती कोरोना मुक्त झाल्यामुळे 156 जणांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात आढळून आलेले 545 कोरोनाबाधित रुग्ण ही आतापर्यंतची उच्चांकी रुग्ण संख्या आहे.
गतवर्षी 392 ही एका दिवसात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. सध्या बेळगाव जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण अर्थात सक्रिय रुग्ण 2822 इतके असून मृत्यूचा आकडा 360 वर पोहोचला आहे.
गेल्या 1 एप्रिल 2021पासून आतापर्यंत जिल्ह्यात 4,567 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर राज्यात नव्याने 35 हजार 24 कोरोनाग्रस्त सापडले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात आज नव्याने आढळून आलेल्या 545 रुग्णांपैकी सर्वाधिक 157 रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत. उर्वरित रुग्णांमध्ये अथणी तालुक्यातील 76, बैलहोंगल 50, चिकोडी 30, गोकाक 104, हुक्केरी 18, खानापूर 10, रामदुर्ग 15, रायबाग 38, सौंदत्ती तालुक्यातील 30 आणि इतर 17 रुग्णांचा समावेश आहे.