कोरोना नियंत्रणासाठी बेळगाव, विजापूर व बागलकोट या उत्तर विभागाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे एडीजीपी भास्कर राव यांचे अभिनंदन करुन स्वागत करण्याबरोबरच कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी बेळगावात “बेंगलोर पॅटर्न” राबवावा, अशी मागणी सिटीझन्स कौन्सिल बेळगावतर्फे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी केली.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) असणाऱ्या भास्कर राव यांच्या कुशल नेतृत्व आणि कार्यक्षमतेमुळे बेंगलोरमधील कोरोनाच्या भयावह परिस्थितीत प्रचंड बदल घडून आला आहे. त्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी कोरोनाला थोपविण्यासाठी भास्कर राव यांची कर्नाटकच्या उत्तर विभागाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याबद्दल भास्कर राव यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच बेंगलोर पॅटर्न बेळगावात राबविण्याची विनंती करण्यासाठी आज दुपारी सिटिझन्स कौन्सिल बेळगावच्या सदस्यांनी अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अंजुमन हॉल येथे त्यांची भेट घेतली.
यावेळी एडीजीपी राव यांच्याशी बोलताना तेंडोलकर यांनी बेळगावच्या पोलीस प्रशासनाची प्रशंसा केली. येथील पोलिसांनी कोरोना प्रादुर्भावाच्या मागील वर्षभराच्या कालावधीत आपले कर्तव्य उत्तमरित्या बजावून लोकांना कोरोनाच्या संकटातून सुरक्षित बाहेर काढले आहे. मात्र अलीकडे कांही बेजबाबदार लोक आणि राजकीय प्रेरित लोकांमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढला असल्याचे सतीश तेंडुलकर यांनी सांगितले. तसेच पूर्वी लोकांना कोरोनाबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे रोग आटोक्यात आणणे अवघड गेले होते. मात्र आता बहुतांश लोकांना कोरोनाची माहिती झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाच्या खबरदारी बाबत सर्वजण ज्ञात झाले आहेत. तेंव्हा आता कोरोनाला रोखण्यासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी केली जावी. तसेच नियमभंग करणार्यांना कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर शिक्षा केली जावी. कोरोनाला काबूत आणण्यासाठी इझराईल प्रमाणे चांगले कायदे अंमलात आणले जावेत, असेदेखील तेंडोलकर यांनी सूचित केले.
आपल्या स्वागत आणि अभिनंदनाबद्दल एडीजीपी भास्कर राव यांनी सिटिझन्स कौन्सिलला धन्यवाद दिले. तसेच बेळगाव शहरासह जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी मी बेळगाव येथे सेवा बजावली आहे.कोविड नियंत्रणात बंदची अंमलबजावणी करताना मानवीयतेचा दृष्टिकोन ठेऊन पाऊले उचलावीत यात राजकीय हस्तक्षेप नकोत अशीही मागणी त्यांनी केली
बेळगाव हे विचारवंतांचे गांव आहे. येथील लोक सुज्ञ आहेत. तेंव्हा या ठिकाणी कोरोनाला आळा घालण्याच्या दृष्टीने आम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागणार नाही असे मला वाटते. राहता राहिला बेजबाबदार आणि राजकीय प्रेरित लोकांचा प्रश्न तर त्यांच्यावरील कारवाईसाठी आम्ही आमची कार्यप्रणाली तयार ठेवली आहे, असे एडीजीपी भास्कर राव यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्यासमवेत शेवंतीलाल शाह, विकास कलघटगी आदी कौन्सिलचे अन्य सदस्य उपस्थित होते.