किणये क्रॉसनजीक गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या डिझेल टँकरवर छापा टाकून सुमारे ९ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मंगळवारी (23 मार्च) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास किणये क्रॉसनजीक अबकारी खात्याने ही कारवाई केली. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. लिंगस्वामी नरसिंह (रा. नरसिंग, जि. नवलगुंद) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अबकारी खात्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदा वाहतूक करण्यात येणार आहे, अशी खात्रीलायक माहिती अबकारी निरीक्षक मंजुनाथ मेल्लीगिरी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह किणयेनजीक डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला थांबवून तपासणी केली.
तपासणी दरम्यान टँकरमध्ये कंपार्टमेंट तयार करुन त्यात गोवा बनावटीचे मद्य ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. एकूण ३ लाख ४३ हजार रुपयांचे मद्य व ६ लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण 9 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अबकारीचे अप्पर उपायुक्त डॉ.वाय. मंजुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जयरामगौडा, आर. एम. मुरगोड व तळेकर यांनी ही कारवाई केली.