Wednesday, May 8, 2024

/

तब्बल 1681 गाड्यांच्या स्केलमॉडेल्सचा संग्रह करणारा अवलिया

 belgaum

आपला दैनंदिन व्याप आणि कामकाज सांभाळून बालपणापासून एखादा छंद जोपासणाऱ्या व्यक्ती फार विरळ असतात. अशाच व्यक्तींपैकी एक असणाऱ्या तब्बल 30 हजार म्युझिक सीडींचा संग्रह करणाऱ्या डॉ. जमील अहमद अम्मणगी यांचा परिचय आपण काल करून घेतला होता. बेळगावातील अशा आणखी एका अवलियाला आपण जाणून घेऊया ज्याच्याकडे शे-दोनशे नव्हे तर तब्बल 1681 गाड्यांचा संग्रह आहे. या अवलियालाच नांव आहे दिलीप सावंत.

हिंदवाडीत राहणारे आणि कडोलकर गल्ली येथे बुक्स अँड स्टेशनरीचे दुकान असणारे दिलीप सावंत यांना फक्त गाड्यांचे मॉडेल्स संग्रहित करण्याचा छंद नाही तर गाड्यांच्या बाबतीतील अभ्यासक देखील आहे. दिलीप यांना बालपणापासून वाहनांची आवड होती. बीएपर्यंत पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात कामाला सुरुवात केली. बीए तृतीय वर्षाला असताना त्यांना इम्पाला गाडीची प्रतिकृती मिळाली. तत्पुर्वी इयत्ता आठवी मध्ये असताना बेंगळूर येथे मिल्टन गाडीची प्रतिकृती त्यांनी घेतली. त्यानंतर शिक्षण, दुकान, लग्न या सर्व व्यापात मध्यंतरी त्यांचा हा छंद मागे पडला. याच कालावधीत मोठा मुलगा परदेशात जाण्याचा व्हिसा मिळवण्यासाठी चेन्नईला गेला असता. दिलीप त्यांच्यासमवेत गेले. त्यावेळी फावल्या वेळात शॉपिंग मॉलमध्ये फेरफटका मारताना पसंत पडलेली एका गाडीची प्रतिकृती त्यांनी विकत घेतली आणि तेथून त्यांच्या गाड्यांच्या संग्रहाला सुरुवात झाली. महत्त्वाचे म्हणजे भारतात या गाड्या खेळण्याच्या दुकानात मिळतात. परंतु या गाड्या म्हणजे खेळणे नसून परदेशात या गाड्या स्केलमॉडेल्स म्हणून विकल्या जातात असे दिलीप सांगतात.

दिलीप सावंत यांच्या संग्रहालयात आजच्या घडीला 1681 गाड्या आहेत. यामध्ये इतिहास कालीन पेटंट मोटार वॅगन, मोटर कॅरेज, ओपल, फोर्ड, शिवलरी, ऑडी, फेरारी, लंबरजीनी, भारतीय बनावटीचे अँबेसिडर आदी विविध प्रकारच्या गाड्यांसह जेम्स बॉण्ड आणि बॅटमॅन यांच्या चित्रपटातील त्यांच्या गाड्यांच्या मॉडेल्सचा समावेश तर आहेच शिवाय आरामदायी गाड्या, पोलीस गाड्या कृषी, अग्निशमन, रुग्णवाहिका, बांधकामाच्या गाड्या, मालवाहतुकीच्या गाड्या अशा सर्व गाड्यांचे मॉडेल्स सावंत यांच्या संग्रहालयात आहेत. प्रत्येक दशकात आणि शतकात तयार झालेल्या गाड्यांचे मॉडेल्स आपल्या माहितीत भर घालणारे ठरतात. या गाड्यांची किंमत 25 ते 30 हजारापासून 100 रुपयांपर्यंत आहे. यापैकी कांही गाड्या अशा आहेत की ज्यांचे आता उत्पादन सुद्धा थांबले आहे.1681 vehicle bikes

 belgaum

गाड्यांच्या इतिहासासंदर्भात दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार इ.स. 1885 मध्ये पहिल्यांदा जगाच्या इतिहासात अमेरिकेमध्ये पेटंट मोटर वॅगन ही गाडी रस्त्यावरून धावली. कार्ला बेन्झ आणि बर्था बेन्झ या दाम्पत्याने या गाडीची निर्मिती केली. त्यावेळी बर्थाला लोकांनी हिणवून कुचेष्टा केली. परंतु ती मागे हटली नाही आणि तेथूनच चार चाकी गाडीचा प्रवास सुरू झाला. मोटर कॅरेज ही दुसरी गाडी डेबरल याने काढली. 19 व्या शतकात ओपल, फोर्ड, शिवरली अशा असंख्य गाड्या बाजारपेठेत आल्या. त्यापाठोपाठ ऑडी, फेरारी, लंबरजीनी या गाड्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. भारतामध्ये 1897 साली पहिली गाडी धावली. त्यानंतर 1940 मध्ये हिंदुस्तान मोटर्सने ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने भारतात चार चाकी वाहन आणले.

भारतात वाहन ही गरज आहे 1944 मध्ये भारतात प्रीमियर, डॉज व फिएट या गाड्या लॉन्च झाल्या, तर 1998 मध्ये भारतात टाटाने पॅसेंजर व्हेईकल सुरू केले आणि 1996 मध्ये लाईट व्हेईकल आणले. महेंद्र कंपनीने 2007 मध्ये पॅसेंजर व्हेईकल सुरू केले. भारतीय बनावटीची अँबेसिडर 1957 मध्ये रस्त्यावर धावू लागली. या सर्व गाड्यांचे स्केल मॉडेल दिलीप सावंत यांच्या संग्रहात आहेत. प्रत्येक गाडीचे वैशिष्ट्य वेगळे आणि इतिहासही वेगळा आहे. चारचाकी गाड्यांबरोबरच दुचाकी गाड्यांच्या प्रतिकृती सुद्धा सावंत यांच्याकडे पाहायला मिळतात.

दुकानाचा व्याप सांभाळून सायंकाळी दररोज दिलीप सावंत आपल्या या संग्रहालयात वेळ घालवतात. संग्रहालयातील सर्व मॉडेल्सची मांडणी त्यांनी अत्यंत कल्पकतेने केली आहे. या ठिकाणी आपल्याला ताण तणावाचा विसर पडतो असे ते सांगतात. या छंदाचा पुढील पिढ्यांना कसा उपयोग होईल? या प्रश्नावर विद्यार्थ्यांना वाहन उद्योग सुरू करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. तसेच काळानुरूप वाहन निर्मिती करण्यासाठी हे संग्रहालय आणि येथील माहिती त्यांना निश्चित उपयुक्त ठरेल, असे सामंत सांगतात. दिलीप यांच्या पत्नी शोभा यांना प्रारंभी आपल्या पतीच्या या छंदाचे अजिबात कौतुक नव्हते. परंतु कालांतराने वाहनांचा इतिहास समजल्यानंतर त्यांनी दिलीप यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली. परदेशात असलेली आपली दुष्यंत आणि दर्शन ही दोन मुलं भारतात परतल्यावर आपले हे संग्रहालय अबाधित ठेवतील अशी दिलीप यांची अपेक्षा आहे. आपल्या संग्रहालयातील प्रत्येक गाडीशी दिलीप सावंत यांचे भावनिक नाते जुळले आहे. त्यांच्याकडील अत्यंत महागड्या गाड्यांसह जगाच्या इतिहासात प्रथमच धावलेल्या गाड्यांचे मॉडेल्स पाहून प्रत्येक जण थक्क होतो हे मात्र निश्चित.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.