नैऋत्य रेल्वेच्या हुबळी रेल्वे विभागाचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय महाप्रबंधक अजयकुमार सिंग सेवानिवृत्त झाल्याबद्दल रेल्वेच्या विविध विभाग आणि कर्मचारी संघटनांतर्फे त्यांचा हृद्य सत्कार करून निरोप देण्यात आला.नैऋत्य रेल्वेच्या हुबळी रेल्वे विभागाचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय महाप्रबंधक अजयकुमार सिंग हे नुकतेच सेवानिवृत्त झाले याबद्दल आयआरटीसीएसओतर्फे काल मंगळवारी महाप्रबंधक अजयकुमार सिंग यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आयआरटीसीएसओ संघटनेचे सुनील आपटेकर, प्रकाश गस्ती, रणजीत किल्लेकर, पी. बाबू, नजीर मकानदार, रमेश कुलकर्णी, विणा, संपतकुमार आदींसह सुमारे 100 तिकीट तपासणी कर्मचारी उपस्थित होते. नैऋत्य रेल्वेच्या हुबळी रेल्वे विभाग महाप्रबंधकपदाच्या आपल्या सुमारे 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नांव कमावण्याबरोबरच एक दयाळू, कल्पक आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून अजयकुमार सिंग यांनी नावलौकिक मिळवला होता.
रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ते इतके प्रिय होते की त्याची प्रचिती नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागात गेल्या आठ दिवसांपासून रेल्वेची विविध खाती आणि कर्मचारी संघटनांतर्फे केल्या जाणाऱ्या त्यांच्या सत्कार समारंभावरून येते. मुख्य निरोप आणि सत्कार समारंभामध्ये तर इमारतीत प्रवेश केल्यापासून ते व्यासपीठाच्या ठिकाणी जाईपर्यंत अजयकुमार सिंग यांच्यावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पुष्पवृष्टी केली जात होती. आपले साहेब महाप्रबंधक पदावरून बाजूला होणार या कल्पनेने यावेळी बरेच जण भावनाविवश झाल्याचे दिसून येत होते.
मूळचे वाराणसी येथील असणाऱ्या अजयकुमार सिंग यांनी 2018 सालच्या उत्तरार्धात हुबळी रेल्वे विभागाच्या महाप्रबंधक पदाची सूत्रे हाती घेतली. अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अन्य अधिकाराप्रमाणे आपले पद न मिरवता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये मिसळून जाऊन त्यांनी त्यांच्या खात्यातील समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे हुबळी विभागाच्या विस्कळीतपणाला एक शिस्त लावली.
आपल्या अधिकार पदाचा कालावधीत अजयकुमार सिंग यांनी हुबळी रेल्वे विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले. महाप्रबंधक झाल्यानंतर फेरफटका मारताना हुबळी रेल्वे स्थानकाच्या आवारात भिकारी आणि बेवारस कुत्री पडिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेंव्हा त्यांनी संबंधित परिसर स्वच्छ करून घेऊन त्या ठिकाणी उद्यानाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे भिकारी स्नान वगैरे करून स्वच्छ राहावेत यासाठी त्यांनी चक्क गरम पाण्याच्या गिझरची व्यवस्था केली.
महाप्रबंधक पदावर असणारे अधिकारी सर्वसामान्यपणे आपल्या तोडीची अधिकारी आणि नेतेमंडळीमध्ये व्यस्त असतो. तथापि अजयकुमार सिंह हे याला अपवाद होते. ते आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकार्यांपासून तळागाळातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये मिसळून जात होते. अनेकांना अडचणीच्या वेळी सिंग यांनी स्वतःच्या खिशातून मदत केली आहे. मध्यंतरी कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात त्यांनी सुमारे 300 कर्मचाऱ्यांची त्यांच्या मूळगावी जाण्याची व्यवस्था करून दिली हे विशेष होय. रेल्वेचे वरिष्ठ तिकीट तपासणी अधिकारी बेळगावचे सुनील आपटेकर यांनी महाप्रबंधक अजय कुमार सिंग हे खरोखर ग्रेट होते. यांच्यासारखा कर्तव्यदक्ष लोकप्रिय महाप्रबंधक याआधी झाला नाही आणि यानंतरही होणार नाही, अशी प्रतिक्रिया बेळगाव लाईव्हशी बोलताना व्यक्त केली.