Saturday, December 21, 2024

/

गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग

 belgaum

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील महिलांची प्रेरणादायी यशोगाथा खास बेळगाव लाइव्हच्या वाचकांसाठी…

अनेक मंडळींना बागेच्या माध्यमातून निसर्गाकडे वळावंसं वाटतं. मनातील सुप्त इच्छा म्हणून शेती करावीशी वाटते. परंतु जागेअभावी ते शक्य होत नाही. यावर उपाय म्हणजे टेरेस गार्डन! बेळगावमध्ये माजी नगरसेविका लालन प्रभू यांनी अशाच एका प्रयोगातून घरच्या घरी भाजीपाल्यासहीत हजारो प्रकारची फुलझाडे, फळझाडे आणि इतर सजावटीची देशी, विदेशी झाडांची बाग फुलवली आहे, तीही चक्क आपल्या गच्चीवर. त्यांचा हा यशस्वी उपक्रम पाहण्यासाठी ‘बेळगाव लाईव्ह’ ने त्यांच्या टेरेस गार्डनला भेट देऊन गच्चीवरच्या मळ्याचा फेरफटका मारला. गेल्या ४० वर्षांपासून आपला अर्ध्याहून अधिक वेळ या झाडांच्या सोबत घालविणाऱ्या लालन प्रभू यांच्याशी केलेली खास बातचीत –

बऱ्याच जणांची शेती करण्याची इच्छा असते. अनेकांची पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी मला फुलविण्याचे इच्छा असते. शेती नसेल तरीही आपल्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये थोडीफार झाडे लावून हि हौस भागविता येते. शहरात सध्या अपुऱ्या जागेमुळे शेती हि संकल्पना केवळ मनातच उरते. परंतु पर्यावरण वाचविण्यासाठी आपण प्रत्येक जण योगदान देवू शकतो फक्त हवी इच्छा. लालन प्रभू यांच्या रामदेव गल्ली येथील घरात असलेल्या टेरेस गार्डनवर हजारो झाडे आहेत. विषविरहित भाजीपाला, फळे, फुले आणि घरापासून अगदी काही अंतरावर जाऊन दररोज फेरफटका मारून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचे समाधान या टेरेस गार्डनमध्ये मिळते.

लालन प्रभू यांचे टेरेस गार्डन साधारण ४००० स्क्वेअर फूट जागेत आहे. या टेरेस गार्डनमधील प्रत्येक झाड हे सेंद्रिय पद्धतीने वाढविण्यात आले आहे. वालाच्या शेंगा, शेवगा, कोबी, फ्लावर, कांद्याची पात, वेलीवरची वांगी, टोमॅटो, मिरची, कडीपत्ता, पुदिना, पालक यासारख्या अनेक भाज्या, आंबा, केळी, पपई, लिंबू, वॉटर ऍपल, फणस, रोजबेरी, पेरू, चेरी, जेरुसलेमची चेरी – बेरी अशी फळझाडे, तर मोगरा, झेंडू, गलाटा, कमळ, रंगीबेरंगी वॉटर लिली, ईस्टरलिली, वाईनलिली, गुलाबी,निळा, पांढरा गोकर्ण, भुईचाफा, सोनचाफा, नागचाफा, रंगीबेरंगी गुलाब, पेट्रिया वॉलीबीलीज (नीलमणी), कृष्णकमळ, बर्ड ऑफ पॅराडाईज, पिंपळी, कैलासपर्णी, गौरी, सोनचाफा, सुपारीबोंड, दुर्मिळ अशी असणारी डोम्बिया, ऑस्ट्रेलियन डेझी अशा अनेक हजारो फुलझाडे या टेरेस गार्डनवर आपल्याला पहायला मिळतात.Lalan prabhu

याशिवाय पळस, दवणा, मरवा यासारखी सुगंधी वनस्पती, बहरलेली तुळस, सीता अशोक, ब्रम्हकमळ, मिंट, रोसमेरी, पिंपळी अशा औषधी वनस्पती, मसाला वनस्पती, लालसुपारी अशी अनेक नानाविध झाडे या टेरेसवर आहेत. याव्यतिरिक्त बोन्साय तरीही संकल्पनाही येथे राबविण्यात आली आहे. दुर्मिळ अशी असणारी डोम्बिया, ऑर्निथोगॅलम, वाळवंटातील गुलाब, मदर-इन-लॉ टंग यासारखी झाडेदेखील या टेरेसवर आहेत. यासोबतच ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वनस्पती, सजावटीच्या वनस्पतीही या गार्डनमध्ये आहेत. शिवाय १००० हुन अधिक झाडे अशी आहेत ज्यांना थेट सूर्यप्रकाशाची गरज नाही. अशा झाडांसाठी विशेष शेडहाऊस देखील निर्माण करण्यात आले आहे. बेळगावमध्ये अशापद्धतीने साकारलेल्या आणि निगा ठेवलेल्या टेरेस गार्डनवर फेरफटका मारणे म्हणजे पर्वणीच आहे.

या गार्डनमध्ये असणारे प्रत्येक झाड हे रसायनमुक्त खतांपासून जोपासले जाते. गूळ आणि ताकाचे मिश्रण यासोबतच गार्डनमधील वेस्टेज कचऱ्यावर ९० प्रक्रिया करून त्यातून निर्माण होणाऱ्या खताची फवारणी या सर्व झाडांवर करण्यात येते. कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येक झाडाची निगा दररोज लालन प्रभू घेतात.

घरातील जवळपास संपूर्ण भाजीपाला याच टेरेस गार्डांवरून त्या घेतात. मोकळ्या जागेचा योग्य वापर, आरोग्यपूर्ण, रसायनविरहित सुरु असलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उपक्रमाला ‘बेळगाव लाईव्ह’चा सलाम आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

-वसुधा कानूरकर सांबरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.