राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव क्षेत्रात मला माझ्यासह बेळगावचे नांव उज्वल करावयाचे आहे असे सांगून मात्र यासाठी आपल्याला आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याचे यंदाचा “बेळगाव श्री” किताब विजेता शरीरसौष्ठवटू प्रसाद बाचेकर याने स्पष्ट केले.
मराठा युवक संघाची 55 वी जिल्हास्तरीय ‘बेळगाव श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकणाऱ्या प्रसाद याने बेळगाव लाइव्हशी बोलताना उपरोक्त प्रतिक्रिया दिली. लक्ष्मी गल्ली, हालगा (ता. बेळगाव) येथील रहिवासी असणारा प्रसाद मंगलकुमार बाचीकर या गुणी होतकरू युवा शरीरसौष्ठवपटूने यापूर्वी जिल्हा आणि राज्यस्तरावरील अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मात्र ‘बेळगाव श्री’ किताबाच्या स्वरूपात जिल्हा पातळीवरील किताब मिळविण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील वर्षी बेळगाव श्री किताबाचा स्पर्धेत त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र निराश न होता जोमाने तयारीला लागताना अधिक परिश्रम घेऊन मागील वर्षी हातातून निसटलेला किताब त्याने यंदा हस्तगत केला.
प्रारंभापासूनच खेळ आणि व्यायामाची आवड असणारा प्रसाद 2016 सालापासून शरीरसौष्ठव क्षेत्राकडे वळला. या क्षेत्रात अल्पावधीत प्रगती करताना 2016 सालीच त्याने गावातील ‘कलमेश्वर श्री’ हा किताब पटकाविला. त्यानंतर 2018 साली प्रसाद बाचीकर ‘मोरया श्री’ या किताबाचा मानकरी ठरला. पुढे त्याने अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हजेरी लावताना पदकांची लयलूट केली. पंजाब येथे 2017 साली झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रसाद बाचेकर याने कर्नाटकचे प्रतिनिधीत्व केले होते, हे विशेष होय.
प्रसाद हा बेळगावातील मोरया जीम या व्यायाम शाळेत व्यायामाचा सराव करतो. आपले प्रशिक्षक प्रसाद बसरीकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तो दररोज सकाळी 3 तास आणि सायंकाळी 3 तास वर्कआउट (व्यायाम) करतो. त्याचप्रमाणे दुपारी 12 ते 1 आणि रात्री 8 ते 9 या कालावधीत तो चालण्याचा देखील व्यायाम करतो. शरीरसौष्ठवासाठी आवश्यक असणारा आहार, खुराक आणि संबंधित अन्य गोष्टींसाठी प्रसाद बाचीकर याला दरमहा सुमारे 30 हजार रुपये खर्च येतो. प्रसाद यांची घरची परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील मंगलकुमार शेतकरी आहेत. मात्र अलीकडे शेतीला देखील चांगले दिवस नसल्यामुळे आपल्या मुलाच्या व्यायामासाठीचा खर्च मंगलकुमार यांना न परवडणारा झाला आहे. यामुळे प्रसादला कर्ज काढून शरीरसौष्ठव अर्थात व्यायामाची आपली आवड जोपासावी लागत आहे.
शरीरसौष्ठव क्षेत्रात नांव कमावण्याची जिद्द बाळगणाऱ्या प्रसाद याने आर्थिक मदतीसाठी अनेकांकडे धाव घेतली होती. मात्र प्रत्येक ठिकाणी त्याची निराशा झाली आहे. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा बाळगणारा प्रसाद त्यासाठी देखील धडपडत आहे. जेणेकरून पगाराच्या पैशातून आपण शरीरसौष्ठव क्षेत्रात चांगली कारकीर्द घडवू, असे त्याला वाटते. एकंदर एकाग्रता, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर जिल्हास्तरीय बेळगाव श्री किताब मिळविणाऱ्या प्रसाद बाचीकर याला शरीरसौष्ठव क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्यासाठी सध्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. तेंव्हा बेळगाव शहर परिसरातील क्रीडाप्रेमी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या कामी पुढाकार घेतल्यास प्रसादचे भवितव्य निश्चितपणे उज्वल होईल यात शंका नाही.
-महेश सुभेदार.