पोलिसांच्या बंदोबस्तात म्हणजे रक्षकांच्या उपस्थितीत धुडगूस घालून शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या वाहनाचा फलक उचकटणाऱ्या आणि खाकीआड भाषिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या त्या भ्याड कन्नडिगांना “वीर कन्नडीग” हा पुरस्कार,
तसेच त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या पोलिसांना “विशेष प्रेरणा” पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शिव समिती बेळगावच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिव समिती बेळगावच्यावतीने रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी उपरोक्त मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त त्यागराजन यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे उपस्थित होते.
रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे धुडगूस घालून शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या वाहनाचा फलक उचकटणाऱ्या आणि खाकीआड भाषिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या त्या भ्याड कन्नडिगांना “वीर कन्नडीग” हा पुरस्कार देऊन सन्मानित करावे तसेच धुडगूस घालणाऱ्या या समाजकंटकांच्या मुसक्या जागीच न आवळता महानाट्य संपेपर्यंत कोणतीच कारवाई न करणाऱ्या पोलिसांना “कर्तव्यदक्ष पुरस्कार” आणि धुडगूस सुरू असताना विडंबनात्मक विचकट हास्याचे प्रदर्शन करून समाजकंटकांना एक प्रकारे प्रोत्साहन देणाऱ्या त्या पोलीस अधिकारी आणि आदल्या दिवशी कोल्हापूर या शब्दाला काळे फासणाऱ्या करवे पट्टाधारी समाजकंटकांना मोठ्या मनाने सहकार्य करणाऱ्या त्या पोलिसाला “विशेष प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित केले जावे.
महत्त्वाचे म्हणजे बेळगावमधील वातावरण कलुषित करून पोलीस प्रशासनाची विश्वासाहर्ता पणास लावून देखील कोणत्याच कारवाई पासून नामानिराळा राहिलेल्या महापालिका झेंडाफेम लुडबुड्या श्रीनिवास ताळुकर याचा पोलीस प्रशासनाने “कर्नाटक उचापती रत्न” हा पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशा आशयाचा तपशील रवींद्र जाधव यांच्या स्वाक्षरीने शिव समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.