सदाशिनगर येथील मुख्य क्रॉससह 2 आणि 3 नंबर क्रॉस येथील कोसळून दयनीय अवस्थेत असलेल्या गटारीचे तात्काळ नव्याने बांधकाम केले जावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सदाशिनगर येथील मुख्य क्रॉससह 2 आणि 3 नंबर क्रॉस येथील गटारीची दयनीय अवस्था झाली आहे. सदर जुनी गटार ठिकठिकाणी कोसळली असल्यामुळे कांही ठिकाणी गटारीला सांडपाण्याच्या खड्ड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
याखेरीज येथील कांही गटारी तर दगडमाती -केरकचरा पडून नामशेष झाल्या आहेत. या भागात जेथे पाहावे तेथे गटारीचे सांडपाणी तुंबून दुर्गंधी पसरण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांचे विशेषतः लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीची दुर्दशा आणि सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांना संध्याकाळी घराबाहेर थांबणे म्हणजे उकिरड्यावर थांबवण्यासारखे वाटते.
सदर जुन्या गटारीच्या जागी नवी गटार बांधण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिक गेल्या 3 वर्षापासून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र आजतागायत कोणीही त्याकडे लक्ष दिलेले नाही.
गल्लीतील नागरिक आणि महिला मंडळांनी गटार बांधकामासंदर्भात महापालिका आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे. परंतु त्याचीही दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी आता गटारीचे बांधकाम त्वरित हाती न घेतल्यास एपीएमसी मार्गावर रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.