रॉंग साईडने वाहन चालवून ज्येष्ठ नागरिकाला ठोकणाऱ्या एका उद्दाम आरटीओ अधिकाऱ्याने आपली चूक कबूल करण्याऐवजी संबंधित वृद्धालाच मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार आज सकाळी शहरातील सम्राट अशोक चौकनजीक घडला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामामुळे शहरातील किल्ल्या नजीकच्या सम्राट अशोक चौक येथे गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकेरी वाहतूक सुरू आहे.
या ठिकाणी आज सकाळी एका आरटीओ अधिकाऱ्याने रॉंग साईडने आपले वाहन चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. वाहनाची धडक बसताच ती वृद्ध व्यक्ती रस्त्यावर खाली कोसळली.
तेंव्हा रहदारी पोलीस आणि आसपासचे नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले. घटनेचे प्रत्यक्षदर्शी असणारे सामाजिक कार्यकर्ते सुरज कणबरकर यांनी रहदारी पोलिसांना संबंधित वृद्ध व्यक्तीची कांही चूक नसून रॉंग साईडने गाडी चालविणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांची चूक असल्याचे सांगितले.
दरम्यान, वाहनाच्या धडकेने किरकोळ जखमी झालेल्या त्या वृद्धानेही घडल्या प्रकाराबद्दल आरटीओ अधिकाऱ्याला जाब विचारताना ‘तुम्ही अधिकारीच असे वागू लागला तर कसे होणार?’ असा सवाल केला. त्यावेळी त्या उर्मट अधिकाऱ्याने आपली चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी वाहनातून उतरून थेट त्या वृद्ध नागरिकावर हल्ला चढवून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
परिणामी भररस्त्यात एकच गोंधळ उडाला. तसेच त्या बिचाऱ्या वृद्धाला आरटीओ अधिकाऱ्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी नागरिक आणि रहदारी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या प्रकारामुळे संबंधित आरटीओ अधिकाऱ्याबद्दल उपस्थितांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. तसेच अशा उद्दाम अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी चांगली समज देण्याची गरज व्यक्त केली जात होती.